Home ठळक बातम्या पालकमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीचे तारणहार, भाजप आमदारांचे ‘ते’ आरोप नैराश्यातून –...

पालकमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीचे तारणहार, भाजप आमदारांचे ‘ते’ आरोप नैराश्यातून – शिवसेनेचा पलटवार

 

एकाच मंचावर येऊन चर्चा करण्याचे शिवसेनेचे आमदार चव्हाणांना खुले आव्हान

डोंबिवली दि.24 फेब्रुवारी :
राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीत 1 हजार 690 कोटींपेक्षा अधिक निधीचे विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे पालकमंत्री आणि खासदार हेच खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे निर्माते असून भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी वैफल्यग्रस्ततेतून त्यांच्यावर ते आरोप केल्याचा पलटवार शिवसेनेने केला आहे. भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याच्या प्रत्युत्तरादाखल डोंबिवली शहर शिवसेनेतर्फे आज पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप खोडून काढत भाजप आमदार चव्हाण यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेसोबत एकाच मंचावर येण्याचे खुले आवाहनही शिवसेनेकडून करण्यात आले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या 2 वर्षांमध्ये सुमारे 1 हजार 700 कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. मग तो बाह्य वळण रस्ता असो, विविध उड्डाणपूल असो, रस्त्यांचे काँक्रीटीकरण असो की भुयारी मार्ग आदी प्रकल्पांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे शिवसेनेतर्फे यावेळी सांगण्यात आले.

तर 13 वर्षे आमदारकी भोगणाऱ्या आणि 3 वर्षे राज्यमंत्रीपद उपभोगलेल्या व्यक्तीला प्रशासकीय बाबी समजत नसतील तर यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती असा सवाल यावेळी माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला. तसेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेवटच्या काळात आमदार चव्हाणांना डोंबिवलीच्या विकासाची आठवण झाली आणि 471 कोटींच्या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल प्रस्ताव तयार केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी न दिल्याने त्याच्या निविदा निघाल्या नाहीत आणि ज्याच्या निविदा नाहीत त्या कामाचे कार्यादेश दिले जात नाही ही साधी तांत्रिक बाब आमदार चव्हाणांना समजत नसल्यास त्यांनी अभ्यास करावा असा खोचक सल्ला दिपेश म्हात्रे यांनी दिला. तर त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात आमच्यासमोर येऊन विकासकामांची चर्चा करण्याचे खुले आवाहनही म्हात्रे यांनी यावेळी दिले.

तर कोवीड काळात कल्याण डोंबिवलीतुन दररोज हजारो रुग्ण येत असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हजारो बेडची अनेक सुसज्ज कोवीड रुग्णालये सुरू केली. कोरोना काळात दिवस रात्र लोकांसाठी काम करीत असताना पालकमंत्री आणि खासदार या दोघांनाही दोन दोन वेळा कोवीडनेही गाठले. मात्र त्यानंतरही न डगमगता पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम केले. मात्र त्याचवेळी भाजप आमदार रविंद्र चव्हाण हे आपल्या गावातील फार्म हाऊसवर बसले होते अशी खरमरीत टिका शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी यावेळी केली.

तसेच एकीकडे पालकमंत्री आणि दुसरीकडे खासदार या दोघांनीही कल्याण डोंबिवलीता कामाचा अक्षरशः धडाका लावला आहे. त्यातून आमदार चव्हाण यांना नैराश्य आले असून ते वाट्टेल ते बरळत आहेत. तर ज्यावेळी विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात त्यावेळी सरकारचे काम व्यवस्थित सुरू आहे असे समजावे असा टोलाही म्हात्रे यांनी यावेळी लगावला.

या पत्रकार परिषदेला शिवसेना डोंबिवली शहर प्रमूख राजेश मोरे, माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे, तात्या माने, किशोर मानकामे, अभिजीत थरवळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा