Home ठळक बातम्या उष्णतेची लाट ; कल्याण डोंबिवलीत आज तब्बल 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची...

उष्णतेची लाट ; कल्याण डोंबिवलीत आज तब्बल 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद

यंदाच्या मौसमातील सर्वोच्च तापमान


कल्याण डोंबिवली दि.15 एप्रिल :

कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले असताना दुसरीकडे आजच्या तापमानाने सर्वानाच मोठा घाम फोडला. कल्याण डोंबिवलीमध्ये आज तब्बल 42.4 डिग्री अंश सेल्सिअस इतक्या भयानक तापमानाची नोंद झाली. जे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमान ठरल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. उष्णतेच्या लाटेसदृश्य असणारी ही परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस अशीच राहण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.(Kalyan Dombivli recorded a temperature of over 42 Celsius today; Highest temperature of this season)

आजची सकाळ उगवली तेव्हाच सूर्यदेवाने पूर्ण दिवसाच्या तापमानाचा काहीसा ट्रेलर दाखवला होता. सकाळी 8 वाजल्यानंतरच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या होत्या. तर दुपारी 12 वाजल्यापासून ते 3 वाजेपर्यंत तर सूर्यप्रकाशाऐवजी सूर्यदेव आग ओकत आहेत की काय असा प्रश्न पडावा इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. आज दिवसभर केवळ आणि केवळ उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा असेच सर्वत्र चित्र दिसून आले. संध्याकाळी 7 वाजल्यानंतरही हवामानातील उष्णतेचा प्रभाव जाणवून येत होता.

त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण एमएमआर रिजनसाठी आजचा दिवस सर्वाधिक हॉट (उष्ण) ठरला. कल्याण डोंबिवलीसह ठाणे, कळवा, मुरबाड, बदलापूर, कर्जत या भागांमध्ये 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले. कल्याणमध्ये एप्रिल 2019 मध्ये रेकॉर्डब्रेक असे 43.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आल्याची माहितीही अभिजीत मोडक यांनी यावेळी दिली. तसेच उद्या यामध्ये काहीशी वाढ होईल किंवा आजच्या सारखीच उष्णतेची लाट जाणवू शकते. उत्तरेकडून येणाऱ्या जमिनीवरील हवेमुळे आणि उच्च हवेच्या दबावाने वार्‍याने दिशा बदलल्याने ही उष्णतेची लाट जाणवू लागल्याची माहिती अभिजीत मोडक यांनी दिली.

दरम्यान या उष्णतेच्या लाटेचा विचार करता नागरिकांनी विनाकारण उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, अधिकाधिक पाणी प्यावे आणि अतिश्रम टाळावे असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

प्रमूख शहरांमध्ये नोंदवण्यात आलेले आजचे तापमान..
कल्याण डोंबिवली ४२.४
मुंबई ३७.९° सेल्सियस
विरार ३९
मीरा रोड ४०.५
मुलुंड ४०.६
नवी मुंबई ४१.५
ठाणे ४१.६
कळवा ४२
धसई ४२.१
पनवेल व भिवंडी ४२.३
बदलापूर ४२.५
मुरबाड ४३.२
कर्जत ४३.७

#LNN
#LocalNewsNetwork

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा