Home ठळक बातम्या उष्णतेची लाट : कल्याण डोंबिवलीचा पारा थेट ४१ अंशापार

उष्णतेची लाट : कल्याण डोंबिवलीचा पारा थेट ४१ अंशापार

दिवसागणिक तापमानात वाढ सुरूच

कल्याण दि.१२ एप्रिल :
कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्हा भयानक गर्मीने अक्षरशः होरपळून निघत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्ये आज ४० अंश डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जणू उष्णतेची लाट आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीसह आसपासची शहरं भयानक गर्मीमुळे भाजून निघत आहेत. गेले दोन दिवस तापमानाचा पारा चढता दिसत असून आज तर तापमानाने कहरच केला आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात ४१ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. सरासरी तापमानपेक्षा आज नोंदवण्यात आलेले तापमान हे ३ ते ४ अंश सल्सिअसने अधिक असल्याची महत्वाची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. कल्याण आणि डोंबिवलीतील तापमानानेही आज थेट ४१ अंशांचा आकडा ओलांडलेला पाहायला मिळाले.

कल्याण शहरात ४१.६ तर डोंबिवलीमध्ये ४१.५ अंश इतक्या तापमानाची नोंद झाल्याचे मोडक यांनी सांगितले. तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात अशीच किंवा यापेक्षा अधिक भयानक परिस्थिती निर्माण झाल्याचे आजच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. इतक्या भयानक परिस्थितीमध्ये नागरिक होरपळून निघण्याचा अनुभव घेत असून आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरांतील आजचे तापमान

मुंबई ३६.५° सेल्सियस
कल्याण ४१.६
डोंबिवली ४१.५
मीरा भाईंदर ३७.८
वसई-विरार ३८
ठाणे ४०.३
कासारवडवली ४०.८
नवी मुंबई ४१
मुंब्रा ४१.१
पनवेल ४१.५
बदलापूर ४१.५
मुरबाड ४३
कर्जत ४३.८

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा