Home ठळक बातम्या कल्याणात या अनोख्या बँकेतून पैशांऐवजी मिळतोय ‘फ्री ऑक्सिजन ‘

कल्याणात या अनोख्या बँकेतून पैशांऐवजी मिळतोय ‘फ्री ऑक्सिजन ‘

केडीएमसी उद्यान विभागाने सुरू केलीय ट्री बँक

कल्याण दि.12 एप्रिल :
कल्याण मध्ये सुरू झालेली एक अनोखी बँक सगळ्यांच्याच आकर्षणाचा आणि कौतुकाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तुम्हाला वाटेल की बँकच आहे मग त्यात एवढा आकर्षण आणि कौतुक ते काय? सध्याच्या काळात बँक म्हटली की पैसे एवढी एकच गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र ही बँक नेमकी कशाची आहे हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हीही या बँकेचं नक्कीच कौतुक कराल. (In Kalyan, this unique bank is giving ‘free oxygen’ instead of money)

उद्यान विभागाच्या पुढाकाराने अनोखी ट्री बँक सुरू…

बँक हा शब्द आपल्याकडे इतका प्रचलित झाला आहे की कोणालाही विचारलं तर सर्वप्रथम पैशांची देवाणघेवाण हेच उत्तर समोर येईल. परंतु कल्याणात सुरू झालेल्या या अनोख्या बँकेच्या माध्यमातून आपल्याला फ्री मध्ये ऑक्सिजन मिळणार असेल तर ? हो बरोबर ऐकलं तुम्ही…कल्याणात सुरू झालेल्या या बँकेमुळे आपल्याला हवा तेवढा आणि तोही अगदी मोफत ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणार आहे. केडीएमसी प्रशासनातील उद्यान विभागाच्या पुढाकाराने ही अनोखी ट्री बँक सुरू करण्यात आली आहे. जी कोणतेही शुल्कन आकारता आपल्याला मोफत झाड उपलब्ध करून देणार आहे. नष्ट होत चाललेली शहरातील वृक्षसंपदा जोपासण्यासाठी आणि पर्यावरण प्रेमींच्या प्रयत्नांना अधिक बळ देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे अशी माहिती केडीएमसी सचिव संजय जाधव यांनी दिली.

वृक्षसंपदा जतन करण्यासाठी…
रस्ता रुंदीकरणात, वादळ वाऱ्यात किंवा आणखी कोणत्याही कारणास्तव झाडं उन्मळून पडतात. या पार्श्वभूमीवर शहरातील वृक्षसंपदा जतन करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. झाडे द्या आणि झाडे न्या या संकल्पनेवर या ट्री बँकेचं काम सुरू राहणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

याठिकाणी मिळणार मोफत वृक्ष…
केडीएमसी मुख्यालयाच्या शेजारील सुभाष मैदान परिसरात असलेल्या उद्यानात ही ट्री बँक उभी करण्यात आली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रजातीचे वृक्ष जतन करण्यात आले आहेत. ज्यांना वृक्ष लागवड करायची आहे त्या नागरिकांना ही झाडे मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली जातात. तर अनेकदा जागेअभावी झाडांचे वृक्षारोपण करता येत नाही. अशा वृक्ष प्रेमींकडूनही झाडे स्वीकारून, जतन करत त्यांची योग्य ठिकाणी लागवड केली जाते.

दरम्यान केडीएमसी उद्यान विभागाने सुरू केलेल्या या ट्री बँकेमध्ये अधिकाधिक लोकांनी खाते उघडावे. आणि शहरातून दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या ऑक्सिजनचा तोटा भरून काढावा, हाच या बँकेच्या आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने सर्वात मोठा नफा ठरेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा