Home क्राइम वॉच NewYear Celebration: कल्याण-डोंबिवलीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त; महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके

NewYear Celebration: कल्याण-डोंबिवलीत पोलिसांचा तगडा बंदोबस्त; महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथके

कल्याण – डोंबिवली दि. 31 डिसेंबर :

आज वर्षाचा शेवटचा दिवस, 31 डिसेंबर. नविन वर्ष अवघ्या काही तासांवर येऊन उभे असून त्याच्या जंगी स्वागतासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. मात्र काही जण अति उत्साहाच्या भरात हुल्लडबाजी करून त्याला गालबोट लावायचा प्रयत्न करतात. मात्र अशा बेधुंद हूल्लडबाजांना ताळ्यावर आणण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. आपला थर्टीफर्स्ट शांततेत आणि आनंदाने साजरा होण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यासह महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके स्थापन केल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. (NewYear Celebration: Heavy police presence in Kalyan-Dombivli; Special Squads for Women’s Safety)

संकटकाळी पोलीस मदतीसाठी डायल करा 112 क्रमांक…
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आवश्यक ती सर्वच खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासोबतच एखाद्या संकटकाळी पोलिसांची मदत मिळण्यासाठी डायल 112 ही यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. 112 क्रमांक डायल केल्यास त्याच्यामध्ये अवघ्या पाच ते सहा मिनिटांत संबंधित व्यक्तीपर्यंत पोलीस मदत पोहचण्याचे नियोजन केल्याची महत्वाची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. हा मुख्यतः केंद्र सरकारच्या पुढाकाराने उपक्रम राबविण्यात येत असून केवळ 31 डिसेंबरच नव्हे तर इतर वेळीही पोलिसांच्या मदतीसाठी नागरिकांना त्याचा वापर करता येऊ शकतो.

महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकांची स्थापना…
31 डिसेंबरच्या रात्री गेल्या काही वर्षांत महिलांबाबत झालेले अनुचित प्रकार लक्षात घेता त्यांच्या सुरक्षेसाठी कल्याण डोंबिवलीमध्ये पोलिसांची विशेष पथके स्थापन करण्यात आल्याची माहितीही डीसीपी गुंजाळ यांनी दिली आहे. शहरांत ज्याठिकाणी नव वर्ष स्वागताचे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातील अशा ठिकाणांवर ही पथके भेट देऊन महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ड्रंक आणि ड्राईव्हविरोधात विशेष नाकाबंदी…
थर्टी फर्स्टच्या रात्री मद्यपान करून गाड्या चालवणे किंवा बेदरकारपणे गाड्या चालवण्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मुद्दा लक्षात घेऊन ड्रंक आणि ड्राईव्ह तसेच बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या व्यक्तींविरोधातही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकात आणि रस्त्यांवर नाकाबंदी करून त्याद्वारे वाहन चालकांची कसून तपासणी केली जाणार असल्याचेही डी सी पी सचिन गुंजाळ यांनी स्पष्ट केले.

त्यामूळे नविन वर्षाचे स्वागत करत असताना त्याचा इतरांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला समजेल अशा भाषेत सांगण्यासाठी पोलिसही सज्ज झाले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा