Home ठळक बातम्या “आमच्या अध्यात्मशक्तीला आव्हान द्याल तर हिंदू समाज शांत बसणार नाही”

“आमच्या अध्यात्मशक्तीला आव्हान द्याल तर हिंदू समाज शांत बसणार नाही”

प्रभू श्रीरामांबाबतच्या ‘त्या ‘ वादग्रस्त वक्तव्याचा श्रीमलंगगड हरिनाम सप्ताह सोहळ्यात निषेध

कल्याण दि. 6 जानेवारी :
आम्हाला राजकारणात पडायचे नाही. राजकारण आमचा विषयही नाही. मात्र आमच्या हृदयात तुम्ही हात घालाल आणि आमच्या अध्यात्म शक्तीला आव्हान द्याल तर त्याचे उत्तरही तसेच मिळेल. हिंदू समाज शांत बसणार नाही अशा शब्दांत ह.भ. प. योगीराज महाराज यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठणकावले. तसेच प्रभू श्रीरामचंद्राविषयी आक्षेपार्ह आणि असंप्रदायिक वक्तव्य करणारे समाजातील बांडगुळ आहेत. या वक्तव्याचा संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव आणि श्रीमलंगगड हरिनाम महोत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे प्रतिपादन या हरिनाम महोत्सवाचे मार्गदर्शक आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांनी केले.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ तालुक्यात श्री मलंगगडाच्या पायथ्याशी सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहामध्ये ते बोलत होते. ह. भ. प. योगीराज महाराजांसह या हरिनाम सप्ताहाच्या आयोजकांकडूनही जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला. कीर्तन महोत्सवाच्या चौथ्या दिवशी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनीही उपस्थित राहून कीर्तनाचा आनंद घेतला.

प्रभू श्रीरामचंद्राविषयी वक्तव्य करणारे समाजातील बांडगुळ…
प्रभू श्रीरामचंद्रा विषयी आक्षेपार्ह आणि असंप्रदायिक वक्तव्य करणारे समाजातील बांडगुळ आहेत. या वक्तव्याचा संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि राज्यस्तरीय अखंड हरिनाम महोत्सव आणि श्रीमलंगगड हरिनाम महोत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. तर अशा बांडगुळांना धडा शिकविण्याची ताकद वारकरी संप्रदायांमध्ये आहे, असे ठाम प्रतिपादन यावेळी या अखंड राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाचे मार्गदर्शक आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री यांनी केले.

प्रभू श्रीरामांनी वनवासात कंदमुळे आणि फळे खाल्ली…
अभ्यास नसणारी माणसं सध्या प्रभू श्रीरामाबद्दल बोलत आहेत की श्रीराम मांसाहारी होते म्हणून. परंतु आमच्याकडे संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाचा पुरावा आहे. त्यात संत एकनाथ महाराजांनी असे सांगितले आहे की जेव्हा प्रभू श्रीरामांना आपले वडील गेल्याचे भरताकडून समजले. तेव्हा वडिलांचे श्राद्ध करण्यासाठी पिंड देण्यात आले. त्यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितले की शास्त्राचा नियम असा आहे की आपण ज्या गोष्टी खातो त्याचेच पिंडदान करावे लागते. मात्र वनवासात आपण अन्न खात नाही, कंदमुळं आणि फळे खाऊन जगतोय. त्यामुळे आपल्याला वडिलांचे श्राद्ध करता येणार नाही असे भावार्थ रामायणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऐऱ्या गैऱ्याच्या बोलण्यावर काहीही विचार करू नका, विश्वास ठेवू नका, आपला प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम आहे, आपला आदर्श असल्याचे मत पैठण येथील ह.भ. प. योगीराज महाराज यांनी या सप्ताहात व्यक्त केले.

वारकरी संप्रदायाची ज्याच्यावर मर्जी त्याचीच सत्ता…
वारकरी संप्रदाय इतका महान आहे की अनेक संप्रदाय त्याने आपल्या पोटात घेतलेले आहेत. महाराष्ट्रात एखाद्या संप्रदायाला पुढे यायचे असेल तर वारकरी संप्रदायाच्या मदतीशिवाय तो पुढे येऊ शकत नाही. तर महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची ज्याच्यावर मर्जी असेल तोच इथून पुढे सत्तेत येणार. त्यामुळे वारकरी संप्रदायाला कोणीही हलक्यात घेत नाही आणि कोणी घेऊही नका असा संदेश यावेळी ह.भ. प. योगीराज महाराज यांनी दिला.

इतर सर्व राजकीय लोकप्रतिनिधींनी हा आदर्श घ्यावा…
ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील वारकरी मंडळांच्या विद्यमाने श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक आहेत. या कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी ह. भ. प. योगीराज महाराजांचे कीर्तन पार पडले. यावेळी कीर्तन महोत्सवाचे स्वागतोत्सुक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही कार्यक्रमाच्या चौथ्या दिवशी उपस्थित राहून कीर्तन महोत्सवाचा आनंद घेतला. या सप्ताहाचे भव्य स्वरूप आणि त्यामध्ये देशभरातील साधू संतांचा सहभाग पाहता हा राज्यस्तरीय नव्हे तर त्याला राष्ट्रीय सप्ताहाचे स्वरूप प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. आणि या सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल योगीराज महाराजांनी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तर इतर सर्व राजकीय लोकप्रतिनिधींनीही त्यांचा हा आदर्श घेण्याची अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी उप महापौर रमाकांत मढवी, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा