Home ठळक बातम्या म्हाडाचा ऐतिहासिक निर्णय: खोणी- शिरढोण येथील लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ 

म्हाडाचा ऐतिहासिक निर्णय: खोणी- शिरढोण येथील लाभार्थ्यांचा शेवटचा हफ्ता माफ 

 खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश

डोंबिवली दि. 21 जानेवारी :

करोना लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे म्हाडाने बांधलेल्या परवडणाऱ्या घरांचा ताबा देण्यास उशिर झाल्याने कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण येथील लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. या लाभार्थ्यांच्या शेवटचा १० टक्क्यांचा हफ्ता माफ करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Mp Dr. Shrikant shinde) यांनी केली होती. या मागणीला यापूर्वी तत्वतः मंजुरी देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत या ठरावाला मान्यता देत त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांचे सुमारे ३२ कोटी रूपये वाचणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Historic MHADA Verdict: Beneficiaries in Khoni-Shirdhon houses)

म्हाडाकडून कल्याण तालुक्यातील खोणी आणि शिरढोण  तालुक्यात परवडणाऱ्या दरातील घरे उभारण्यात आली आहेत. या घरांसाठी २०१८ मध्ये सोडत काढण्यात आली होती. तर २०२ पर्यंत विजेत्यांना घराचा ताबा देणे अपेक्षित होते. मात्र या दरम्यान करोनामुळे ही प्रक्रिया धीम्या गतीने राबविली गेली. परिणामी  लाभार्थ्यांना घरांचा ताबा मिळाला नाही. त्याचवेळी या घरांच्या  कर्जापोटी लाभार्थ्यांना बँकांचे हफ्ते भरावे लागत होते. एकीकडे ताबा न मिळालेल्या घरांचा हफ्ता तर दुसरीकडे घरभाडे अशा  दुहेरी आर्थिक कोंडीमध्ये लाभार्थी अडकले होते. त्यातच
करोनामुळे नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने लाभार्थ्यांचे हाल सुरू होते.

या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी घराचा शेवटचा हफ्ता माफ करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हाडा प्रशासनाकडे केली होती. याबाबत त्यांनी कोकण गृहनिर्माण महामंडळ- म्हाडासमवेत अनेकवेळा बैठका घेत पत्रव्यवहार देखील केला होता. त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कोकण गृहनिर्माण  मंडळातर्फे नागरिकांच्या घराचा शेवटचा हफ्ता माफ करण्याचे  आश्वासन  देण्यात आले होते.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. नुकत्याच झालेल्या म्हाडाच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे येथील 2 हजार लाभार्थ्यांना याच थेट फायदा होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे म्हाडाने ऐतिहासिक निर्णयघेतला असून लाभार्थ्यांनी खासदार डॉ. शिंदे यांचे मोठे आभार  मानले आहेत.

लाभार्थ्यांना होणार थेट फायदा…
म्हाडा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे खोणी आणि शिरढोण प्रकल्पातील प्रत्येक विजेत्याचे १ लाख ६३ हजारांनुसार सर्व लाभार्थ्यांचे ३२ कोटी ६२ लाख रुपये वाचले आहेत. लाभार्थ्यांची संख्या 2 हजारांहून अधिक आहे. म्हाडाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हा ऐतिहासिक निर्णय आहे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…
म्हाडाच्या लाभार्थ्यांची आर्थिक कोंडी पाहता आपण शेवटचा  हफ्ता माफ करण्याची मागणी केली होती. त्यावर निर्णय झाला असून लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हा ऐतिहासिक निर्णय असून यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बीएसयुपी  घरांचा पालिकेचा वाटा देण्यापासूनही सुट मिळवण्याचा ऐतिहास निर्णयही यापूर्वीच शासनाकडून घेण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा