घर कामगार महिलांच्या अडचणींबाबत कल्याणात झाली परिषद
कल्याण दि.7 जुलै :
घरामध्ये काम करणारी महिला असो की छोट्या – मोठ्या पदांवर. त्यांच्या अडचणींचे स्वरूप बदलते मात्र प्रमाण नाही. कारण महिलांना पुरुषांपेक्षा अधिक अडचणींचा सामना करावा लागतो अशा शब्दांत केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी महिला वर्गाची व्यथा मांडली. साईबाबा ग्राम विकास प्रतिष्ठान आणि प्रियजन गुणगौरव समिती वतीच्या माध्यमातून कल्याणात प्रथमच घरकाम करणाऱ्या महिलांच्या समस्या निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आयुक्त डॉ. जाखड यांनी उपस्थित घर कामगार महिलांशी संवाद साधला. (Irrespective of the position, women face more difficulties than men – KDMC Commissioner Dr. Indurani Jakhad)
घरकाम करणाऱ्या महिलांनी संघटित व्हायला पाहिजे आणि आपल्या समस्या – प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतःच मार्गही काढला पाहिजे. त्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील घर कामगार महिलांनी बचत गटांमध्ये सहभागी व्हावे. जेणेकरून आपल्या अडचणी सोडवण्याचा विश्वास आणि मार्ग त्यांना यातून मिळू शकेल असे आवाहनही यावेळी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले.
तर अशा प्रकारची परिषद पहिल्यांदाच होत असून घर कामगार असणाऱ्या महिला वर्गाच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने आमचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी केले. या असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या समस्या सोडवायच्या असतील तर तुम्ही एकत्र येणे आवश्यक आहे. ज्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकारच्या केडीएमसीमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देता येईल असे हिंदुराव यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान या कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांनी आपले प्रश्न मांडताना घरं, आरोग्य, मुलांचे शिक्षणासह 60 वर्षे उलटून गेलेल्या महिलांना शासनाकडून पेन्शन मिळावी अशा प्रमुख अपेक्षा व्यक्त केल्या.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश लटके, ज्येष्ठ पत्रकार रमेश दुधाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माया कटारिया यांच्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील घर कामगार करणारा महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.