Home ठळक बातम्या निवडणुकीच्या रिपोर्टकार्डवर मार्क मिळण्यासाठी आधी काम करणे आवश्यक – खासदार डॉ. श्रीकांत...

निवडणुकीच्या रिपोर्टकार्डवर मार्क मिळण्यासाठी आधी काम करणे आवश्यक – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला

खोणी – शिरढोण म्हाडा रहिवासी संघटनेतर्फे जाहीर सत्कार

डोंबिवली दि.3 ऑक्टोबर :
येणाऱ्या निवडणूकीत आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये मार्क देण्याचे काम मतदार करणार आहेत. मात्र या रिपोर्टकार्डवर मार्क मिळण्यासाठी आधी विकासकामे करण्याची आवश्यकता असते, अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या विरोधकांचा समाचार घेतला. खोणी शिरढोण म्हाडा रहिवासी महासंघातर्फे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी नाव न घेता आपल्या विरोधकांचा खरपूस शब्दांत समचार घेतला. (It is necessary to work first to get a mark on the election report card – MP Dr. Srikant Shinde’s challenge to his opponents)

टिका करण्यापूर्वी आधी एखादे तरी विकासकाम करा…
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा आपल्यासाठी एक परिवार आहे. येणाऱ्या निवडणूकीत आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये मार्क देण्याचे काम मतदार करणार आहेत. परंतु मार्क कशावर देणार तर जे विषय आपण सोडवलेले असतात त्यावर मार्क दिले जातात. लोकांनी आपल्याला मार्क देण्यासाठी आधी आपल्याला लिहावे लागेल की आपण रस्ता केला, दिवाबत्ती केली, गटार केले. टिका करण्यापूर्वी आधी एखादे तरी विकासकाम करून तरी दाखवा अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नामोल्लेख टाळून विरोधकांना लक्ष्य केले.

आपल्या नावापुढे माजी लागणार नाही याची दक्षता घ्या…
आपल्याला एक संवेदनशील मुख्यमंत्री लाभले असून त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहोत. मात्र त्यानंतरही काही लोकं रोज उठून खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. तर इकडच्या काही लोकांनाही टीका करायची सवय असून काहींना आता मोठमोठी स्वप्नं पडू लागली आहेत. लोकांनी 5 वर्षे जबाबदारी दिलेल्या जबाबदारीत काहीही कामे करता आली नाहीत. तर आता अजून मोठी स्वप्नं पडायला लागली आहेत, मोठी स्वप्न पडण्याला हरकत नाही. मुंगेरीलाल के हसीन सपने, स्वप्नं बघा मात्र आपल्या पदापुढे आजीच्या जागी माजी लागणार नाही याचीही दक्षता घ्या अशा तिखट शब्दांमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले.

कल्याण लोकसभेत पुन्हा डॉ. श्रीकांत शिंदेच…
तर गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी पूर्णविराम दिला. आपल्या लोकसभा मतदारसंघाची काळजी करू नका, कल्याण लोकसभा मतदारसंघातून आपणच निवडणूक लढणार आणि पुन्हा मोठ्या मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

म्हाडा रहिवासी संघातर्फे जाहीर सत्कार…
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या खोणी – शिरढोण म्हाडा वसाहतीमधील 2 हजार नागरिकांचा घराचा शेवटचा हप्ता माफ करण्यात आला होता. त्याबद्दल खोणी म्हाडा रहिवासी संघटना आणि शिरढोण म्हाडा रहिवासी संघ यांच्या वतीने खासदार डॉ. शिंदे यांचा विशेष समारंभात सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देत रहिवाशांनी खासदार डॉक्टर  श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा