Home ठळक बातम्या कल्याणच्या रौप्य महोत्सवी स्वागतयात्रेत घुमणार “जयघोष हिंदुत्वाचा – जल्लोष कल्याणकरांचा”

कल्याणच्या रौप्य महोत्सवी स्वागतयात्रेत घुमणार “जयघोष हिंदुत्वाचा – जल्लोष कल्याणकरांचा”

हिंदू धर्मातील सर्व समाजघटक होणार पारंपरिक वेशात सहभागी; ६ एप्रिलपासून सुरू होणार सांस्कृतिक कार्यक्रम

कल्याण दि.२९ मार्च :
कल्याणात गुढीपाडव्यानिमित्त येत्या ९ एप्रिलला काढण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी (२५ वे ) वर्ष असून त्यामध्ये मोठ्या संख्येने जयघोष हिंदुत्वाचा – जल्लोष कल्याणकरांचा पाहायला मिळेल असा विश्वास आयोजक इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या डॉ. प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेची माहिती देण्यासाठी कल्याणच्या आयएमए हॉलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.(“Jay Ghosh Hindutvacha – Jallosh Kalyankarancha” will ring in the silver jubilee reception of Kalyan.)

कल्याणातील हिंदू नववर्ष स्वागतयात्रेचे यंदा 25 वे वर्ष असून इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणकडे त्याचे आयोजनपद देण्यात आले आहे. या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेमध्ये कल्याणकरांचा सहभाग वाढविण्यासाठी आयएमए कल्याणकडून गेले वर्षभरापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आणि या सर्व प्रयत्नांना मोठया प्रमाणात यश आल्याचे सामाजिक संस्था आणि लोकसहभागावरून २५ हजारांच्या आसपास कल्याणकर सहभागी होणार असल्याचे आयएमएच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर यांनी सांगितले.

*६ ते ९ एप्रिलपर्यंत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…*
यंदाच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेच्या कार्यक्रमांची सुरुवात ६ एप्रिलपासून केली जाणार आहे. ६ एप्रिल रोजी कल्याणच्या ऐतिहासिक भगवा तलाव येथील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची आरती सोहळा, ७ एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेत ठिकठिकाणी स्वच्छता अभियान, ८ एप्रिल रोजी वासुदेव बळवंत फडके मैदानात सांगितिक कार्यक्रम होणार असून महाराष्ट्राच्या कलाविश्वात नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील गायक नचिकेत लेले, डॉ. संकेत भोसले, कोरिओग्राफर आशिष पाटील, कलाकार आदिती सारंगधर हे युवा कलाकार त्यात सहभागी होणार असल्याची माहिती स्वागतयात्रेचे समन्वयक आयएमएचे डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली. तर रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेनिमित्त फडके मैदानात २५ फुटांची भव्य गुढीही उभारण्यात येणार आहे.

*९ एप्रिलला कल्याणात घुमणार जयघोष हिंदुत्वाचा…*
“जयघोष हिंदुत्वाचा – जल्लोष कल्याणकरांचा” या ब्रीद वाक्याखाली ही स्वागतयात्रा काढण्यात येईल. ही रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा असल्याने त्यामध्ये कल्याणातील प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक सामाजिक संस्थेला सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळे यामध्ये मराठी बांधवांसोबत गुजराथी, मारवाडी, पंजाबी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय अशा सर्वच प्रांतातील समाज बांधव पारंपरिक स्वरूपात सहभाग घेणार आहेत. मुख्य स्वागतयात्रा ही नेहमीप्रमाणे मुरबाड रोड येथून सकाळी ६.३० वाजता निघून कमिश्नर बंगला, रामबाग, सहजानंद चौक, छ्त्रपती शिवाजी महाराज चौक, केडीएमसी, देवी अहिल्याबाई चौक, लोकमान्य टिळक चौक, पारनाका, लालचौकीमार्गे वासुदेव बळवंत फडके मैदानात पोहोचेल. तर नविन कल्याण अशी ओळख असणाऱ्या साईचौक खडकपाडा आणि स्व. विशाल भोईर चौक उंबर्डे परिसरातून दोन नव्या उपयात्रा फडके मैदानात पारंपरिक यात्रेमध्ये जोडल्या जाणार असल्याचेही डॉ. प्रशांत पाटील यांनी सांगितले.

तसेच यंदाच्या रौप्य महोत्सवी स्वागतयात्रेमध्ये फोटोग्राफी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून त्यातील विजेत्यांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲड. निशिकांत बुधकर यांनी यावेळी दिली.

या पत्रकार परिषदेला कल्याण संस्कृती मंचचे ऍड. निशिकांत बुधकर, खजिनदार अतुल फडके, स्वागतयात्रा समनव्यक डॉ. प्रशांत पाटील, आयएमए कल्याणच्या नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, नवनिर्वाचित सचिव डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. अश्विन कक्कर, डॉ. विकास सुरंजे यांच्यासह कल्याण संस्कृती मंच आणि आयएमएचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा