Home ठळक बातम्या ‘राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणा’त कल्याण डोंबिवली देशात 12 व्या स्थानी ; नाशिक,नागपूर, पिंपरी...

‘राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणा’त कल्याण डोंबिवली देशात 12 व्या स्थानी ; नाशिक,नागपूर, पिंपरी चिंचवडला टाकले मागे

नवी दिल्ली दि.7 मार्च :

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयातर्फे (Ministry of Housing & Urban Affairs) सन 2020 साठी घेण्यात आलेल्या ‘राहण्यायोग्य शहरांच्या सर्वेक्षणा’त (ease of living index) कल्याण डोंबिवलीने (kalyan dombivli) देशामध्ये 12 वा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी अशी ओळख असणाऱ्या नागपूर (nagpur), वाईन कॅपिटल (wine capital) अशी ओळख असणाऱ्या नाशिक (nashik) आणि समृद्ध संपन्न शहर अशी ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) शहरांना कल्याण डोंबिवलीने या सर्वेक्षणात मागे टाकले आहे.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयातर्फे देशातील 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या 111 शहरांमध्ये गेल्यावर्षी हे सर्वेक्षण करण्यात आले. ज्यामध्ये या सर्व शहरांतील 32 लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला होता. गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाचे राज्यमंत्री हरदिप सिंह पुरी यांनी नुकताच या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले.

त्यामध्ये पहिल्या 10 शहरांमध्ये बेंगरुळू (66.70 गुण) 1ल्या, पुणे (66.27गुण) 2ऱ्या, अहमदाबाद (64.87 गुण) 3ऱ्या, चेन्नई (62.61)4थ्या, सुरत (61.73) 5व्या, नवी मुंबई (61.60) 6व्या, कोईम्बतुर (59.72) 7व्या,वडोदरा (59.24) 8व्या, इंदौर (58.58) 9व्या, आणि मुंबई उपनगर (58.23)।शहर 10 व्या क्रमांकावर आले आहेत. त्यापाठोपाठ 58.16 गुण मिळवत ठाणे शहराचा 11 वा क्रमांक आला असून त्यानंतर 58.71 गुण मिळवत कल्याण डोंबिवली शहरं 12 व्या स्थानी आली आहेत. तर 2018 मध्ये झालेल्या या सर्वेक्षणात कल्याण डोंबिवलीचा 50 वा क्रमांक आला होता.

या 111 शहरांच्या झालेल्या ‘इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणा’मध्ये शहरांची राहणीयोग्य गुणवत्ता, आर्थिक क्षमता, शहराची सामाजिक – सांस्कृतिक आणि शैक्षणिक सुरक्षितता, रोजगार संधी, स्वच्छता, सार्वजनिक मैदाने, जमिनीचा वापर, कचरा व्यवस्थापन, नागरिकांचा प्रतिसाद, महापालिका प्रशासनाचा कारभार, सेवा-सुविधांचा दर्जा, पालिकेची आर्थिक स्थिती, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आदी प्रमूख घटकांचा समावेश होता. ज्यामध्ये नागरिकांनी दिलेल्या गुणांकनांचा एकत्रित विचार करून मग केंद्र सरकारने ‘राहण्यायोग्य शहरांची’ ही यादी आणि क्रमांक जाहीर केले.

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अधिकारी- कर्मचारी आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन लिमिटेडच्या टीमने अथक प्रयत्न करून विविध कार्यक्षेत्रात केलेल्या आमूलाग्र सुधारणांमुळे हा 12 वा क्रमांक मिळाल्याचे कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे संगण्यात आले. https://eol.smartcities.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला 111 शहरांची यादी आणि मिळालेले गुणांकनाची संपूर्ण माहिती मिळू शकेल.

सर्वेक्षणात कल्याण डोंबिवलीला मिळालेले गुणांकन…

इज ऑफ लिव्हिंग
इज ऑफ लिव्हिंग (ओव्हरऑल)- 57.71 गुण – 12वा क्रमांक

क्वॉलिटी ऑफ लाईफ – 57.80 गुण – 9वा क्रमांक

इकॉनॉमिक एबीलिटी – 19.89 गुण – 17वा क्रमांक

सस्टेंबिलिटी – 56.11 गुण – 25वा क्रमांक

सिटीजन परसेप्शन – 77.60 गुण – 21 वा क्रमांक

म्युनिसिपल परफॉर्मन्स

म्युनिसिपल परफॉर्मन्स (ओव्हरऑल) – 46.36 गुण – 26वा क्रमांक

सर्व्हिसेस – 55.90 गुण – 26 वा क्रमांक

फायनान्स – 48.37-गुण – 38वा क्रमांक

टेक्नॉलॉजी – 25.80 गुण – 28वा क्रमांक

प्लॅनिंग – 29.19 गुण – 37वा क्रमांक

गव्हर्नन्स – 58.25 गुण – 8वा क्रमांक

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा