Home ठळक बातम्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केडीएमसी साजरा करणार अनोखा ‘ निसर्गोत्सव ‘

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केडीएमसी साजरा करणार अनोखा ‘ निसर्गोत्सव ‘

 

कल्याण-डोंबिवली दि.3 जून :
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनातर्फे दोन दिवसांच्या निसर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत केडीएमसीतर्फे पर्यावरण जागृती विषयक भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली.
यामध्ये घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासह आयुर्वेदीक झाडांची माहिती देणारे निसर्गोत्सव प्रदर्शन, केडीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, दैनंदिन जीवनात सायकल वापर करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, हिरकणी महिला सायकल ग्रुपला हेल्मेट वाटप आदी उपक्रमांचा समावेश आहे.

असे असणार आहेत पर्यावरण दिनाचे कार्यक्रम…
माझी बाग, माझा परिसर या विषयाच्या अनुषंगाने आयोजित फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्या 3 स्पर्धकांना 5 जून रोजी सकाळी 10.00 वाजता स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सहभागी स्पर्धकांचा देखील प्रशस्तीपत्र
देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील दानशूर व्यक्तींकडून तसेच विविध सामाजिक संस्थाकडून प्राप्त सायकली महापालिकेच्या शाळांमधील गरजू विदयार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांमध्ये पर्यावरण आणि शारिरिक स्वाथ्य राखण्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून कल्याण आणि डोंबिवली शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

त्याप्रमाणे महापालिकेच्या मुख्यालयातील तळ मजल्यावरील मोकळ्या जागेत कल्याण डोंबिवली निसर्गोत्सव २०२२ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 जून रोजी सकाळी 10.00 वाजता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 5 जून आणि 6 जूनला सकाळी 10.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांसाठी विनाशुल्क खुले राहणार आहे. यामध्ये रोपांची काळजी कशी घ्यावी, स्वयंपाक घरातील कच-यापासून खत निर्मिती, विविध आयुर्वेदिक रोपांची माहिती, लँडस्केप ट्रे, किचन गार्डनिंग आदी विषयक माहिती दिली जाईल. तसेच महापालिका परिक्षेत्रातील निवडक नर्सरीकडून रोपांची माहिती आणि स्वस्‍त दरात विक्री असे अनेकविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. त्याप्रमाणे 5 आणि 6 जून या दोन्ही दिवशी पर्यावरणातील तज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शनही केले जाणार आहे.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली, महापालिका सचिव संजय जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.

हजारो झाडांनी बहरलेले आंबिवली येथील कल्याणचे फुफ्फुस होतेय अधिक सुदृढ…

कल्याण टिटवाळा मार्गावर असणाऱ्या आंबिवली येथील ५० एकर टेकडीवर केडीएमसी प्रशासनाकडून अत्यंत देखण्या अशा वनाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामध्ये आपल्या आयुर्वेदात अतिशय महत्व असणाऱ्या विविध फुलं आणि फळ झाडांचा समावेश असून हे विस्तीर्ण वन म्हणजे कल्याण शहराचे फुफ्फुस म्हणून नावारूपाला येतेय. विविध प्रकारच्या वृक्ष संपदेमुळे याठिकाणी अनेक प्रजातीचे पक्षी, जंगली प्राणी, कीटक आदींचा हळूहळू मनसोक्त वावर सुरू झाल्याची माहितीही यावेळी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली. तर यासोबतच या टेकडीला लागून असणाऱ्या वन खात्याच्या सुमारे ४६ एकर टेकडीवरही अशीच वनसंपदा निर्माण करण्याचा मानस असून त्यादृष्टीने वन विभागाकडे पाठ पुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा