Home ठळक बातम्या नियमितपणे ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा महावितरणकडून सन्मान

नियमितपणे ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा महावितरणकडून सन्मान

डोंबिवली आणि उल्हासनगर विभागाचा उपक्रम

कल्याण दि.31 जानेवारी :

कल्याण परिमंडलातील डोंबिवली आणि उल्हासनगर-दोन विभागाकडून नियमितपणे ऑनलाईन वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांचा नुकताच प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. ऑनलाईन तसेच तत्पर देयक भरणा वाढवण्याच्या उद्देशाने आणि सजग ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दोन्ही विभागांनी स्वतंत्रपणे हा उपक्रम राबवला. संबंधित वीज ग्राहकांनी या उपक्रमाचे कौतूक करत महावितरणचे आभार मानले.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून आणि कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील आणि कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला.


73 टक्के डोंबिवलीकर ग्राहकांची ऑनलाईनला पसंती…

डोंबिवली विभागात सर्व वर्गवारीतील १ लाख ७६ हजार वीज ग्राहक आहेत. यातील सुमारे ७३ टक्के ग्राहक दरमहा आपल्या वीजबिलांचा डिजिटल माध्यमातून ऑनलाईन भरणा करतात. तर बहुतांश ग्राहक तत्पर देयक भरणा मुदतीच्या आत वीजबिल भरून सवलतीचा लाभ घेतात. नियमितपणे ऑनलाईन व तत्पर देयक भरणा मुदतीच्या आत वीजबिल भरणाऱ्या प्रत्येकी दहा ग्राहकांची लॉटरी पद्धतीने निवड करून मुख्य अभियंता औंढेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, एलईडी बल्ब आणि झाडाचे रोपटे देऊन प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. याच धर्तीवर उल्हासनगर उपविभाग पाच अंतर्गत पंधरा जागरूक वीज ग्राहकांना मुख्य अभियंत्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डोंबिवलीतील बसवराज शेणवा आणि रमेश आठल्ये या ग्राहकांनी या उपक्रमाचे कौतूक करत सन्मानाचा अनपेक्षित सुखद धक्का दिल्याबद्दल महावितरणचे आभार मानले.

यावेळी अधीक्षक अभियंते पाटील, भोळे, वरिष्ठ व्यवस्थापक योगेश अमृतकर, डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल वनमोरे, उल्हासनगर दोन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले, अधिकारी, कर्मचारी, वीज ग्राहक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा