Home कोरोना कोवीड काळात खासगी डॉक्टरांच्या मदतीमुळेच अनेकांचे जीव वाचले – नगरविकास मंत्री एकनाथ...

कोवीड काळात खासगी डॉक्टरांच्या मदतीमुळेच अनेकांचे जीव वाचले – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

 

इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या सुसज्ज कार्यालय आणि सभागृहाचे उद्घाटन

कल्याण दि. 23 मे :
कोवीड काळात आपलेदेखील परके झालेले आपल्याला दिसून आले. कल्याण डोंबिवलीमध्ये तर कोणत्याही प्रकारची आरोग्य सुविधा नसताना इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण, होमिओपथी संघटना, कल्याण पूर्व मेडीकल प्रॅक्टिशनर, निमा आदी संघटनांच्या डॉक्टरांनी केलेल्या मदतीमुळे अनेकांचे जीव वाचले असे गौरवोद्गार नगरविकास आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या सुसज्ज कार्यालय आणि सभागृहाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कोवीड काळात मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवलीमध्ये सर्वाधिक रुग्ण असल्याने आपण चिंतेत होतो. परंतु खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि इथल्या सर्व डॉक्टरांनी आपली चिंता कमी करण्याचे काम केल्याची आठवणही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली.

तर कोवीड काळात खासगी डॉक्टरांनी एक रुपयाचाही मोबदला न घेता केलेले काम हे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशामधील एकमेव उदाहरण असल्याचे गौरवोद्गार कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी काढले. तसेच कल्याण आयएमए आणि डॉक्टरांच्या इतर संस्थांनी केडीएमसीला मदत केली नसती तर कोवीडचे हे संकट आपण पेलू शकलो नसतो असेही खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

कल्याण आयएमएचे काम हे खूपच आश्वासक असून कल्याण डोंबिवलीत खासगी डॉक्टर आणि महापालिका एकत्र येऊन करत असणारे काम हा इतर शहरांसाठी आदर्श असल्याचे मत केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. कोवीडचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर इथल्या तोकड्या आरोग्य सुविधा पाहता आयुक्त म्हणून आपल्याला काहीशी भिती वाटली होती. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण आयएमएसह सर्व डॉक्टर पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने त्यावर मात करता आल्याचेही डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे सुसज्ज कार्यालय आणि सभागृह असावे हे आमचे कित्येक वर्षांचे स्वप्न होते. जे आज पूर्ण होत आहे. तर या सोबतच कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक कम्युनिटी रुग्णालय सुरू करायची इच्छाही इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी बोलून दाखवली.

दरम्यान या कार्यक्रमात आयएमए कल्याण शाखेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा डॉ. प्रशांत पाटील यांची नियुक्ती तर उपाध्यक्ष म्हणून डॉ. ईशा पानसरे तर सेक्रेटरी म्हणून डॉ. सुरेखा ईटकर यांची आणि खजिनदारपदी डॉ. हिमांशू ठक्कर यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य इंडियन मेडीकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, आमदार विश्वनाथ भोईर, प्रा. अशोक प्रधान, मनोहर पालन, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह कल्याण आयएमएचे डॉ. सोनाली पाटील, डॉ. राजेश राघव राजू, डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. प्रदीप सांगळे, डॉ. हिमांशू ठक्कर, डॉ. आश्विन कक्कर, डॉ. संदेश रोठे, डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. अमित श्रीवास्तव आदी सदस्य पदाधिकारीही उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा