Home ठळक बातम्या कल्याणात मराठा आंदोलकांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना दाखवले काळे झेंडे; तर आंदोलकांनी विरोधाचा विचार...

कल्याणात मराठा आंदोलकांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना दाखवले काळे झेंडे; तर आंदोलकांनी विरोधाचा विचार करण्याचे बावनकुळेंकडून आवाहन

कल्याण दि.28 ऑक्टोबर :

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविजय 2024 च्या दौऱ्यावर असलेल्या
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही आज मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कल्याण पश्चिम विधानसभेतील चौकसभे दरम्यान मराठा समाज बांधवांकडून त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर या चौकसभेपूर्वीच प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही सर्व जण मराठा आरक्षणाच्या बाजूने असून आंदोलकांनी विरोधाचा विचार करण्याचे आवाहन केले. (Maratha protesters show black flags to BJP state president in Kalyan)

मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाहीये…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवत मराठा समाजाला आरक्षण देण्याची जाहीर घोषणा केली आहे. ज्या उद्धव ठाकरे सरकारने हे आरक्षण घालवलं. त्या सरकारला लाथ मारून एक मर्द मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता संकल्प केत आहे. 13 कोटी जनता आणि सर्व पक्षांनी आपल्याला समर्थन दिले आहे. आम्ही सर्व जण मराठा समाजाच्या बाजूने असून कोणाचाही विरोध नाहीये. मग नेत्यांना रोखणे, गावबंदी यावर विचार केला पाहिजे असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठा आंदोलकांना केले. चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या भिवंडी लोकसभच्या दौऱ्यावर असून कल्याण पश्चिमेत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते.

भाजपचा मराठा समाजाच्या आरक्षणाला पूर्ण पाठींबा…
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे आवश्यक आहे ते सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी यासाठी विशेष अधिवेशन बोलावले तरीही ते मान्य आहे. भारतीय जनता पक्ष हा मराठा समाजाच्या आरक्षणाला पूर्ण पाठींबा दैणारा पक्ष आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुरुवात केली ते विधीमंडळ, मंत्री मंडळ, हायकोर्टात मान्य होऊन सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले. पण उद्धव ठाकरे यांच्या नतद्रष्ट सरकारने ते घालवले. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात कोणताही पाठींबा पाहिजे असेल तर आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहोत असे सूतोवाचही बावनकुळे यांनी यावेळी केले.

तो आमच्या घरातील प्रश्न आम्ही निपटून पुढे जाऊ…
पोलीस प्रशासनाकडून भाजप कार्यकर्त्यांना दूजाभाव मिळत असल्याची तक्रार भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नेते असून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार हे प्रचंड ताकदीने समन्वय साधून काम करत आहेत. महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष असून आमचीच जबाबदारी आहे तिन्ही पक्षाना सांभाळून घेणे. कल्याणात शिवसेना एकनाथ शिंदे मोठे भाऊ आहेत, त्यांची भाजपच्या कार्यकर्त्यांना संभाळून घेण्याची भूमिका आहे, आम्ही महाराष्ट्रात संभाळून घेण्याची भूमिका आहे. शेवटी एकनाथ जी आणि आम्ही सर्व लोकं भाजपच्या कार्यकर्त्यांना संभाळत आहेत, पण काही थोडे कमी जास्त असेल तर आमच्या घरातील प्रश्न आहे, तो निपटून टाकू. एकनाथजी आणि आम्ही सर्व भाऊ भाऊ आहोत, थोडे गैरसमज झाले असतील तर आम्ही ते मान्य करू आणि पुढे जाऊ असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावर पडदा टाकला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा