Home ठळक बातम्या पाणी प्रश्नावरून मनसे भाजप आक्रमक; आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

पाणी प्रश्नावरून मनसे भाजप आक्रमक; आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

केडीएमसी मुख्यालयावर काढला तहान मोर्चा


कल्याण – डोंबिवली दि.18 एप्रिल :
कल्याण ग्रामीण भागातील पाणी प्रश्नाबाबत मनसे आणि भाजप आज चांगलेच आक्रमक झालेले दिसले. पाणीप्रश्नी केडीएमसी मुख्यालयावर मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढत भाजप आणि मनसे आमदारांनी बैठकीत केडीएमसी, एमआयडिसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले.

कल्याण ग्रामीण भागातील पाणी प्रश्नावरून मनसेने आज केडीएमसी मुख्यालयावर तहान मोर्चाचे आयोजन केले होते. ज्याला भाजपनेही आपला पाठींबा दर्शवत सहभाग नोंदवला. कल्याण पश्चिमेच्या सर्वोदय मॉलपासून सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये मनसे आणि भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केडीएमसीसह आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

बैठकीला प्रशासनाचे मुख्य अधिकारी उपस्थित नसल्याने मनसे आणि भाजप आमदारांचा रौद्र्वतार

केडीएमसी मुख्यालयावर धडक दिल्यानंतर मोर्चातील शिष्टमंडळ प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी मुख्यालयात आले. परंतु या बैठकीला केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी आणि एमआयडीसीचे मुख्य अधिकारी उपस्थित नव्हते. परिणामी मनसे आमदार राजू पाटील आणि भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला. हजारो नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केडीएमसी अधिकारी अजिबात गंभीर नसल्याचा घणाघात या दोघांनी केला.

तर मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की खड्ड्यात गेली ती आमदारकी. लोकांचा प्रश्न प्रशासन गांभीर्याने घेणार नसेल तर आपल्याला चांगलेच महागात पडेल, आपल्याला लाजा वाटल्या पाहिजेत, प्रशासकीय इमारतीला टाळे ठोकून बाहेर उभे राहू, बघू कोण येतं ते अशा शब्दांत उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 27 गावांना केडीएमसी प्रशासनाने वाऱ्यावर सोडले असून पाण्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे. भविष्याचा विचार करता लोकांची प्राथमिकता ठेवत याठिकाणी दूरगामी उपाय योजना करण्याची गरज मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली.

तर भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्या रौद्रवतारापुढे उपस्थित अधिकारी एकदम अवाकच झाले. प्रशासकीय कार्यवाही आम्हाला शिकवू नका, नको तो शहाणपणा करायचं नाही. तुम्हाला माज आलाय, आम्हाला तुम्ही काय वेडे समजताय का? पाणी पुरवठ्याबाबत धोरणात्मक निर्णय असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात काय अडचण आहे? असा संतप्त सवाल विचारत उपस्थित प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. तर साधारणपणे ज्याठिकाणी एखाद्या गावात टँकर सुरू होतो तो भाग जिल्हाधिकारी दुष्काळग्रस्त घोषित केला जातो. 27 गावांमध्येही 200 पेक्षा जास्त टँकरने पाणी पुरवठा होत असेल तर हा संपूर्ण भाग दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी आमदार रविंद चव्हाण यांनी यावेळी केली.

दरम्यान मनसे आणि भाजपने एकत्रित काढलेल्या मोर्चाबाबत आमदार रविंद्र चव्हाण यांना विचारले असता लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही यापूर्वीही अनेकदा एकत्र आलो आहोत. लोकहितासाठी एकत्र येण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांची कोणतीही हरकत नसून पूर्विसुद्धा एकत्र होतो आणि आताही आम्ही एकत्र असल्याचे आमदार रविंद चव्हाण यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा