Home ठळक बातम्या कोंडेश्वर आणि बारवी धरण परिसरात यंदाही पावसाळी पर्यटनाला बंदी; तहसीदारांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू...

कोंडेश्वर आणि बारवी धरण परिसरात यंदाही पावसाळी पर्यटनाला बंदी; तहसीदारांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू  

(फाईल फोटो)

ठाणे दि. ६ जुलै :

गेल्या काही वर्षांत अतिउत्साही पर्यटकांच्या मूर्खपणामूळे झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदाही अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर आणि बारावी धरण परिसरात पावसाळी पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. अंबरनाथच्या तहसीलदार प्रसांती माने यांनी यासंदर्भात आदेश जारी करत कोंडेश्वर आणि बारवी धरण परिसराच्या ३ किलोमीटर हद्दीमध्ये 4 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत धबधबा परिसरात मद्यपान करणे, धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे, खोल/वाहत्या पाण्यात उतरणे-पोहणे आदी कृत्यांना प्रतिबंध घातले आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील कोंडेश्वर धबधबा आणि बारावी धरण परिसर हा पावसाळी पर्यटनासाठी लोकांची सर्वात आवडती ठिकाणे. अत्यंत मनमोहक असे वातावरण, निसर्गाचा वरदहस्त आणि त्याजोडीला धुंवाधार पाऊस यामुळे अशी या दोन्ही ठिकाणांची महती. केवळ अंबरनाथ आणि बदलापूरमधूनच नाही तर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आदी शहरांतील अनेक निसर्गप्रेमींची पावले पावसाळ्यात आपसूकच या ठिकाणांकडे वळतात. मात्र इतर पावसाळी पर्यटन स्थळांप्रमाणे मद्यपी आणि अति उत्साही पर्यटकांकडून होणाऱ्या चुकीच्या कृत्यांमुळे याठिकाणीही गेल्या काही वर्षांत दुर्घटना वाढू लागल्या आहेत. ज्या पार्श्वभूमीवर यंदाही दोन्ही ठिकाणी पावसाळी पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे आणि त्याचा फटका निसर्ग प्रेमींना बसत आहे.

त्यामुळे कोंडेश्वर परिसरातील धामणवाडी, तारवाडी, भोज,  वऱ्हाडे, दहिवली, मळीची वाडी तसेच चांदप गावच्या हद्दीतील बारवी धरण परिसरातील बारवी नदी, पिंपळोली, आस्नोली, सागाव ते बारवी धरण गेट नं.3 येथील या परिसराच्या 3 किमी क्षेत्रात खालील कृत्यांना प्रतिबंध घालण्यात आला आहे.

या गोष्टींना घालण्यात आलीय बंदी…

धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्य सेवन करून प्रवेश करणे,

मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे उघड्या जागेवर मद्य सेवन करणे

पावसामुळे धोकादायक ठिकाणे धबधबे, दऱ्याचे बंदरे, धोकादायक वळणे आदी ठिकाणी सेल्फी काढणे

कोणत्याही स्वरूपाचे चित्रीकरण करणे

रहदारीवर परिणाम करणाऱ्या ठिकाणी फोटोग्राफी करणे,

वेगाने वाहणाऱ्या धोकादायक पाण्यात / खोल पाण्यात उतरणे आणि पोहणे,

धबधब्याच्या वरील बाजुस जाणे अथवा धबधब्याच्या धोकादायकरित्या पडणाऱ्या पाण्याच्या झोता खाली बसणे,

धोकादायक स्थितीत जिवीत हानी होईल अशा धबधबे किंवा तलाव याठिकाणी पाण्यात उतरणे,

रहदारिच्या ठिकाणी तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे,

वाहन अतिवेगाने चालविणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे वाहन चालविणे,

वाहनाने ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे,

सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्या, थर्माकॉलचे- प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे,

असभ्य आणि अश्लील हावभाव, शेरेबाजी अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे,

सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे,  डीजे सिस्टीम वाजवणे, गाडीमधील स्पिकर/ वूफर वाजवून ध्वनिप्रदूषण करणे,

ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु आणि जलप्रदूषण होईल, अशी कोणतीही कृती करणे,

धरण/तलाव/धबधब्याचे 3 कि.मी परिसरात दुचाकी / चारचाकी/ सहाचाकी वाहनाने प्रवेश करणे

आदी कृत्यांना ३१ जुलै पर्यंत प्रतिबंध घालण्यात आल्याचे आदेश अंबरनाथ तहसीलदार माने यांनी दिले आहेत.

दरम्यान या आदेशाना पर्यटक कितपत गांभिर्याने घेतात हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा