Home ठळक बातम्या खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी आगीत जळून खाक

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी आगीत जळून खाक

कल्याण दि.27 फेब्रुवारी :
भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला आज दुपारी अचानक आग लागली. या आगीमध्ये ही गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकली नाही.

एका कार्यक्रमानिमित्त खासदार कपिल पाटील हे शहाड येथील पाटीदार भवन येथे आले होते. हॉलबाहेर असणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या ताफ्यातील गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी साधारण एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या ताफ्यात अंगरक्षकांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीला आग लागली. भररस्त्यात उभ्या असलेल्या गाडीने अचानक पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली. तर प्रसंगावधान राखत या गाडीच्या पूढे मागे असणाऱ्या इतर गाड्या तात्काळ हलवून आग लागलेल्या गाडीपासून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्या.

तर कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन विभागाला याची माहिती मिळताच अग्निशमन विभागानेही तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून सुदैवाने त्यात कोणालाही दुखापत झाली नाही.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा