Home ठळक बातम्या गौरीपाडा तलावातील कासवांच्या मृत्यूचे गूढ कायम; वैद्यकीय अहवालाकडे शासकीय यंत्रणांचे लक्ष

गौरीपाडा तलावातील कासवांच्या मृत्यूचे गूढ कायम; वैद्यकीय अहवालाकडे शासकीय यंत्रणांचे लक्ष

 

कल्याण दि.24 जानेवारी :
कल्याण पश्चिमेच्या गौरीपाडा तलावात एकाच वेळी झालेल्या अनेक कासवांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. तर मृत कासवांचे नमुने विविध शासकीय संस्थांना तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यानंतरच मृत्यूचे कारण समजू शकेल अशी माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Mystery of death of turtles in Gauripada lake remains; Attention of government agencies to medical reports)

कल्याणच्या गौरीपाडा तलावातील अनेक कासव 2 दिवसांपूर्वी मृत्युमुखी पडल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांचा मृत्यू होण्याची ही कल्याणातील पहिलीच घटना असून प्राणी प्रेमींसह नागरिकांनी त्याबाबत संशय व्यक्त केला आहे. तर या घटनेमूळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध विभागांसह राज्य शासनाचा वनविभागही सक्रीय झाला आहे. या सर्व शासकीय संस्थांनी घटनास्थळी धाव घेत कासवांचे तसेच तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तलावातील पाण्याचे नमुने सेंट्रल फिशरीज इन्स्टिट्यूटकडे तर मृत कासवांचे व्हिसेरा नमुने हे कलिना येथील प्रयोगशाळेसह मुंबई व्हेटरनरी महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. येत्या 2- 3 दिवसांत त्यांचे अहवाल आल्यानंतरच या कासवांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल असे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान या तलावातून वनविभागाने 55 मृत आणि 12 जिवंत कासव बाहेर काढले आहेत. मृत्यू झालेले सर्व कासव हे भारतीय प्रजातीचे होते. तर कासवांच्या या मृत्यूमुळे तलावात मासेमारी करणारे स्थानिक हवालदिल झाले असून कासवांच्या मृत्यूचे कारण लवकरात लवकर सांगण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा