Home क्राइम वॉच कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 6 अट्टल आरोपींकडून 24 गुन्हे उघड

कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 6 अट्टल आरोपींकडून 24 गुन्हे उघड

 

कल्याण दि.24 जानेवारी :
कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 6 अट्टल आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ज्यामध्ये 2 महिला आरोपींचाही समावेश आहे. महात्मा फुले पोलिसांनी या अट्टल गुन्हेगारांकडून चेन स्नॅचिंग, जबरी चोरी, मोबाईल आणि मोटार सायकल चोरीचे तब्बल 24 गुन्हे उघडकीस आणत 200 ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि 9 मोटारसायकल असा 15 लाख 38 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरती दयानंद पाटील, 25 वर्षे आणि शालिनी संजय पवार अशी महिला आरोपींची नावे आहेत. या दोघीही कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मार्केटमध्ये गर्दीचा फायदा उचलत ब्लेडने पिशवी कापून त्यातील ऐवज बेमालूमपणे चोरी करायच्या. पोलीस चौकशीत या दोघीनीही 8 गुन्ह्यांची कबुली दिली असून रोख रकमेसह 158 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिनेही एमएफसी पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली.

तर सीसीटीव्हीत कैद झालेली मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्याप्रकरणी आंबविलीच्या इराणी वस्तीत राहणाऱ्या मुस्सु उर्फ मुस्तफा जाफर संजय सैय्यदलाही एमएफसी पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. त्याच्याकडून चेन स्नॅचिंगचे 3, मोबाईल स्नॅचिंगचे 2 आणि मोटारसायकल चोरी आदी 8 गुन्हे उघडकीस आणत 43 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 2 मोटारसायकल आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तर रात्री काळा तलाव परिसरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या साजिद अन्सारी, समीर हाश्मी आणि सालील लुंड या तिघा आरोपींना अटक करत महात्मा फुले पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेल्या 5 मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. तर मोटारसायकल चोरीच्याच गुन्ह्याप्रकरणी आकाश उर्फ आक्या रामदास यशवंते आणि नेत्रा उर्फ जॅक मिलान या दोघांना अटक करून चोरीची महागडी बाईक हस्तगत केल्याची माहितीही डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली.

ही कारवाई महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण, दिपक सरोदे, ढोले, ओऊळकर, पोलीस हवालदार विजय भालेराव, संदीप भालेराव, पोलीस नाईक सचिन भालेराव, जाधव, टिकेकर, मधाळे, हासे, कांगरे, गामणे, एसीपी स्कॉडमधील हवालदार पवार, पोलीस नाईक श्याम वाघ, गुणवंत देवकर, नरसिंग वळवी आदींच्या पथकाने केली.

दरम्यान गेल्या कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांमध्ये उघड झालेल्या विविध गुन्ह्यांमध्ये आंबिवलीच्या इराणी वस्तीतील गुन्हेगारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली जाईल अशी माहितीही डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा