Home बातम्या मतदारयादीतून नावे गायब ; ” मतदान नाकारणे हा आमच्यासारख्या करदात्या नागरिकांवर अन्याय...

मतदारयादीतून नावे गायब ; ” मतदान नाकारणे हा आमच्यासारख्या करदात्या नागरिकांवर अन्याय “

कल्याण दि.20 मे :
एकीकडे पाचव्या टप्प्यातील मतदानाला सकाळपासून उत्साहात प्रारंभ झाला असतानाच अनेक मतदारांच्या आनंदावर मात्र मतदार यादीत नाव नसल्याने पाणी फेरलेले पाहायला मिळाले. परिणामी संतापलेल्या काही नागरिकांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना याप्रश्नी धारेवर धरत त्यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या मांडल्याचा प्रकार समोर आला आहे. तर केवळ मतदार यादीत नाव नाही म्हणून मतदान नाकारणे म्हणजे हा आमच्यासारख्या करदात्या नागरिकांवर अन्याय असल्याची संतप्त प्रतिक्रियाही काही जणांनी व्यक्त केली. (Names missing from electoral roll; “Denial of voting is injustice to tax paying citizens like us”)

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिमेत हा प्रकार घडला. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष यांनी मतदार यादीत आपले नावं नसल्याच्या तक्रारी केल्या. तसेच गेल्या वेळेला आम्ही आमचा मतदानाचा अधिकार बजावला असताना यावेळी अचानक आमची नावे यादीतून कशी काय वगळण्यात आली असा संतप्त सवाल या नागरिकांनी विचारला.

तर याचा जाब विचारण्यासाठी काही नागरिकांनी कल्याण पश्चिमेतील मुंबई विद्यापीठ उपकेंद्रात असलेल्या मतदान केंद्रात जाऊन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावेळी यादीत नाव नसल्याने आपल्याला मतदान करता येणार नाही असे उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांना सांगण्यात आले. त्यामूळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तिकडेच ठिय्या मांडत निवडणूक आयोगाच्या कामाबाबत आपला रोष व्यक्त केला.

दरम्यान एकीकडे नागरिकांनी मतदान करावे म्हणून गेले महिनाभर निवडणूक आयोगाकडून जनजागृती केली जात होती. मात्र दुसरीकडे मतदार यादीमध्ये नाव नसल्याने अनेक मतदारांना इच्छा असूनही मतदान करता न आल्याने त्यांनी निवडणूक आयोगाबाबात नाराजी व्यक्त केली.

तर मतदान हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. आम्ही दरवर्षी सरकारला मोठ्या प्रमाणात कर भरणा करतो. त्याठिकाणी आमचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड कनेक्टेड आहे. अशावेळी केवळ मतदार यादीत नाव नाही म्हणून आमचा मतदानाचा अधिकार हेरावून घेणे म्हणजे अत्यंत अन्यायकारक बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया कल्याणातील किशोर देसाई यांनी एलएनएन शी बोलताना व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा