Home ठळक बातम्या Loksabha election Update : कल्याणमध्ये 47.08 तर भिवंडी लोकसभेमध्ये 56.41 टक्के मतदान

Loksabha election Update : कल्याणमध्ये 47.08 तर भिवंडी लोकसभेमध्ये 56.41 टक्के मतदान

गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा मतदानात काही टक्क्यांनी वाढ

भिवंडी लोकसभेतील भिवंडी ग्रामीणमध्ये तब्बल 65 टक्के मतदान

मात्र यादीत नाव नसल्याने अनेक जण मतदान न करताच माघारी

कल्याण डोंबिवली दि.21 मे :
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील बहुचर्चित मतदान काल संपन्न झाले. राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात 47.08 टक्के आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अंदाजे 56.41 टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा काही टक्क्यांनी अधिक मतदान झाले असून मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले मत नोंदवले आहे याचा उलगडा 4 जूनलाच होऊ शकेल. मात्र मतदार यादीमध्ये नावे नसल्याने मोठ्या संख्येने नागरिक आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावू शकले नाही. परिणामी अनेक मतदारांनी निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणेबाबत तीव्र शब्दांत रोष व्यक्त केल्याचे दिसून आले.

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाला काल सकाळी 7 वाजल्यापासूनच अतिशय आश्वासक अशी सुरुवात झाली होती. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या असह्य झळा बसत असल्यानेही दुपारचे ऊन टाळण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळपासूनच रांगेत उभे होते. मात्र दूपारी 11 नंतर मतदान केंद्रांवरील गर्दी हळूहळू कमी होऊ लागली. आणि नंतर पुन्हा 4 नंतर नागरिकांच्या मतदानासाठी रांगा लागल्याचे दिसून आले.

मात्र काल सूर्यदेवाच्या उष्णतेपेक्षा अधिक रुद्रावतार हा मतदार यादीमध्ये नाव नसल्याने मतदान करू न शकलेल्या लोकांचा पाहायला मिळाला. अनेक जणांची यादीमध्ये नावेच नसल्याची बाब सकाळी 9 – 10 वाजेपर्यंत समोर आली. आणि त्यावरून एकच गोंधळ आणि गदारोळ उडाला. कल्याण आणि भिवंडी लोकसभेच्या विविध मतदारसंघात थोड्याफार फरकाने हेच चित्र होते. विशेषतः कल्याण पश्चिमेत या मतदारांच्या संयमाचा बांध फुटून त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र मनस्तापाशिवाय आमच्या पदरी काहीच पडले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया कल्याण पश्चिमेतील नागरिकांनी दिली. एका एका घरातील 2, 3, 5 जणांपासून ते तब्बल 15 जणांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याची माहिती या नागरिकांनी दिली.

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान आकडेवारी

भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान 56.41 टक्के (अंदाजित आकडेवारी)

 • 134 भिवंडी ग्रामीण – 65 टक्के(LNNNews)
 • 135 शहापूर – 63.57 टक्के
 • 136 भिवंडी पश्चिम – 53.72 टक्के
 • 137 भिवंडी पूर्व – 48.60 टक्के
 • 138 कल्याण पश्चिम – 50 टक्के
 • 139 मुरबाड – 59.20 टक्के (LNN NEWS)

कल्याण लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान 47.08 टक्के (अंदाजित आकडेवारी)

 • 140 अंबरनाथ – 45.81 टक्के(LNNNews)
 • 141 उल्हासनगर – 46.12 टक्के
 • 142 कल्याण पूर्व – 50.01 टक्के
 • 143 डोंबिवली – 42.51 टक्के
 • 144 कल्याण ग्रामीण – 47.03 टक्के
 • 149 मुंब्रा कळवा – 46.60 टक्के(LNN NEWS)

दरम्यान कल्याण आणि भिवंडी लोकसभेत गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा अधिक मतदान झाले आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी ग्रामीणमध्ये तब्बल 65 टक्के इतक्या मोठ्या मतदानाची नोंद झाली. तर कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली विधानसभेत 42.51 इतक्या कमी मतदानाची नोंद झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

त्यामुळे येत्या 4 तारखेला कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडते याचा राजकीय वर्तुळात आतापासूनच अंदाज लावण्यास सुरुवात झाली आहे. कोणाचा अंदाज खरा ठरतो आणि कोणाचा चुकीचा हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल तोपर्यंत पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…असा फिल्मी डायलॉग मारायला काही हरकत नाहीये.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा