Home ठळक बातम्या नुसत्या ‘भारत माता की जय घोषणा देऊन काही होत नाही – मुख्यमंत्री...

नुसत्या ‘भारत माता की जय घोषणा देऊन काही होत नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा टोला

 

डोंबिवली दि.7 सप्टेंबर :
एकीकडे जर आपल्या देशातील नागरिक औषधपाणी, ऑक्सिजन आदी आरोग्याच्या सुविधांपासून वंचित असतील तर नुसत्या ‘भारत माता की जय’ घोषणा देऊन काय उपयोग? ती भारतमाता आपल्याला काय बोलेल अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव भाजपला टोला लगावला. कल्याण डोंबिवलीतील कोपर पुलासह विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला. मात्र या सोहळ्यात झालेली मान्यवरांची भाषणे पाहता हा विकासकामांचा सोहळा कमी आणि निवडणूक प्रचाराची सभा असेच काहीसे चित्र दिसून आले.

धार्मिक मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील…
धार्मिक मंदिरे बंद असली तरी लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य मंदिरे मात्र आज सुरू आहेत. त्याबद्दल जनता आपल्याला आशिर्वाद देत असून धार्मिक मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येतील असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कल्याण डोंबिवलीच्या साडे सहा हजार कोटींच्या बॅकलॉगचे काय?
आपल्या भाषणात डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी डीपीआर मंजूर होऊनही अद्याप काम सुरू न झालेल्या 428 कोटींच्या रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले की बॅकलॉगबाबत बोलायचे झाले तर 400 कोटी, साडेचारशे कोटींसह अगोदर साडेसहा हजार कोटींबाबत माहिती घ्यावी लागेल.

फेरीवाल्यांचा उच्छाद मोडून काढा…
शहरातील स्कायवॉक असो की इतर ठिकाणे. फेरीवाल्यांचा उच्छाद मोडून काढण्यासाठी अत्यंत कठोर कायदा राबवावा लागेल. तो आटोक्यात आणण्यासाठी कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवता येणार नाही असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला एकप्रकारे फेरीवाल्यांवरील कडक कारवाईचे निर्देश दिले.

कपिल पाटील आणि आपल्यातील कनेक्शन स्ट्रॉंग…
या ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचा आवाज सभागृहात ऐकू येत नव्हता. मात्र आपल्याला त्यांचा आणि त्यांना माझा आवाज ऐकू जात असल्याचे सांगत आमच्यातील कनेक्शन स्ट्रॉंग असल्याची मिश्किल टिप्पणीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच केंद्र आणि राज्य सरकारने मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी एकत्र या...
कल्याण डोंबिवलीसाठी रस्ते, पूल, रुग्णालये जे काही पाहीजे ते आपण देऊ. तुम्ही सर्व जण एकत्र बसा, जेवढे काही शक्य असेल ते आपण देऊ असेही मुख्यमंत्र्यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांना उद्देशून सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी कल्याण डोंबिवली परिसरात सुरू असणाऱ्या विकास कामांबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे तर केंद्र सरकारचा कोवीड इनोव्हेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे यावेळी विशेष शब्दांत कौतुक केले.

दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याचा हा कार्यक्रम होता. मात्र त्यात सहभागी मान्यवरांनी केलेल्या टिका, टिप्पणी, राजकीय शेरेबाजी, चिमटे आणि शाब्दिक चकमकींमूळे ही निवडणुक प्रचाराची सभा आहे की काय असा भास काही काळ निर्माण झाला होता. यावेळी कोपर उड्डाणपूल, तेजस्विनी बसेस, ऑक्सिजन प्लँट, शास्त्रीनगर रुग्णालयातील सुसज्ज ओटी विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामार्फत ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, शहर अभियंता सपना कोळी, सचिव संजय जाधव यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा