Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी नव्या डिसीपीआरमध्ये भरपूर वाव – सुधाकर नागनुरे

कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी नव्या डिसीपीआरमध्ये भरपूर वाव – सुधाकर नागनुरे

 

कल्याण दि.9 फेब्रुवारी :
नुकत्याच लागू झालेल्या सर्वसमावेशक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीद्वारे (युडीसीपीआर – युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड रेगुलेशन्स) शहरांच्या सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीसारख्या शहरांच्या सर्वांगिण विकासासाठीही या नव्या युडीसीपीआर नियमात भरपूर वाव असल्याचे मत राज्य सरकारच्या नगररचना विभागाचे संचालक सुधाकर नागनुरे यांनी व्यक्त केले. एमसीएचआय कल्याण डोंबिवली आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘डिकोडिंग युडीसीपीआर’ परिसंवादात ते बोलत होते. दिवसभर चाललेल्या या परिसंवादाद्वारे नव्या बांधकाम आणि विकास नियमावलीतील तरतुदींची सखोल माहिती देण्यात आली.

यापूर्वी बांधकाम परवानगी ही अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया होती. मात्र राज्य शासनाच्या या नव्या युडीसीपीआर (युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड रेगुलेशन्स) मध्ये अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत पद्धतीने सर्व नियम बनवण्यात आले आहेत. मुंबई आणि एमआयडीसी सोडून संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा एकच युडीसीपीआर लागू असणार असून तो बनवणे हे खरोखरच एक आव्हानात्मक काम असल्याचेही नागनुरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर कल्याण डोंबिवली शहरांना लागलेला घाणेरड्या शहरांचा डाग पुसून काढण्यासाठी आपण काम करत असून त्यांचा कायापालट करण्यासाठी सर्वांचे एकत्रितपणे सहकार्य आवश्यक असल्याचे मत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. कल्याण डोंबिवली शहरांचा कायापालट करण्यासाठी येत्या काळात अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू झाले आहेत. त्यामध्ये अर्धवट स्थितीतील प्रकल्प पूर्ण करणे, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नविन रस्ते बनवणे, अस्तित्वातील प्रमूख 35 रस्त्यांचे सौंदर्यीकरण करणे, खाडीकिनाऱ्याचे सुशोभीकरण करणे, चांगले गार्डन विकसित करणे, खेळाची मैदाने बनवणे, फुटपाथ मोकळे करणे यांसारखी अनेक कामे हाती घेण्यात येत आहेत. तर कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यावर अधिक भर देण्यात येत असून येत्या 1 ते 2 महिन्यात वाडेघर डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकणे पूर्णपणे बंद होईल असा विश्वासही डॉ. सूर्यवंशी यांनी यावेंळी व्यक्त केला. कल्याण डोंबिवली शहरांनी कात टाकण्यासह इथल्या नागरिकांचे राहणीमान, जीवनमान सुधारण्यासाठी आम्ही सर्व ताकदीने प्रयत्न करत असून त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांचा सहभागही तितकाच महत्वाचा असल्याची साद डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विकासकांना घातली.

एमसीएचआय कल्याण डोंबिवली आणि काळ्या डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आयोजित या सेमिनारमजध्ये कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी आदी ठिकाणचे विकासक, बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, नगरचना अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सेमिनिअरच्या माध्यमातून विविध तज्ञांनी नविन युडीसीपीआर (युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड रेगुलेशन्स) मधील तरतुदी, बदल, नियम यासारख्या महत्वाच्या घटकांवर सखोलपणे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली महापालिका शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली, कल्याण डोंबिवली एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे, माजी अध्यक्ष रवी पाटील, दिपक मेहता, मिलिंद चव्हाण, अमित सोनवणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा