Home ठळक बातम्या राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांना तातडीने आर्थिक मदत करा – आमदार राजू पाटील यांची...

राज्यातील पोल्ट्री व्यवसायिकांना तातडीने आर्थिक मदत करा – आमदार राजू पाटील यांची मागणी

डोंबिवली दि.13 जानेवारी :
बर्ड फ्ल्युने नुकसानग्रस्त कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यवसायिकांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले असून त्याद्वारे ही मागणी केली आहे.

कोरोनाच्या महासंकटातून सावरत असताना पोल्ट्री व्यवसायिकांना बर्ड फ्ल्युने घेरले. सोमवारी मुंबई, ठाणे, परभणी, दापोली, बीड, अकोला, लातूर, गोंदिया, चंद्रपूर आदी भागांतील पक्षांचे नमुने ‘बर्ड फ्ल्यु’ संसर्गाने पॉझिटीव्ह आले. त्यामुळे राज्यात अलर्ट जाहीर करण्यात आला असून बर्ड फ्ल्युची भिती पसरून कोंबड्या आणि अंड्याचा भाव पूर्णपणे गडगडला आहे. हॉटेल,रेस्टॉरंटमध्ये चिकन आणि अंड्यांची मागणीही मोठ्या प्रमाणात घसरल्याने पोल्ट्री व्यवसायिकांकडे पाळलेल्या कोंबड्या नष्ट करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. बर्ड फ्ल्युमुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायिकांबरोबरच लाखो लोकांचा रोजगारही बुडाला आहे. शेतीपूरक सर्वात मोठा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाकडे पाहिले जाते. परंतु वर्षभरात कोरोना आणि बर्ड फ्ल्युच्या संकटामुळे हा व्यवसाय पूर्णपणे आर्थिक डबघाईला आला आहे. शासनाकडून विविध माध्यमातून बर्ड फ्ल्युमुळे चिकन,अंडी खाल्याने कोणताही धोका नसल्याचा प्रचार करण्यात येत असला तरी नागरिकांमध्ये भिती परसल्याने चिकन,अंड्यांची विक्री पूर्णपणे ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.
आधीच कोरोनाच्या संकटातून बाहरे येत असताना आता बर्ड फ्ल्युच्या संकटात सापडलेल्या कुक्कुटपालन व्यवसायिकांना शासनाने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. शासनाने तातडीने राज्यातील सर्व पोल्ट्री व्यवसायिकांना सरसकट आर्थिक मदत करुन सहकार्य करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा