Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छता-सौंदर्यीकरणाला आता लोकसहभागाची जोड

कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छता-सौंदर्यीकरणाला आता लोकसहभागाची जोड

शासनाच्या स्पर्धेसाठी केडीएमसीने कसली कंबर

कल्याण डोंबिवली दि. 2 नोव्हेंबर :
गेल्या कित्येक महिन्यांपासून कल्याण डोंबिवलीसाठी अत्यंत कळीचा मुद्दा ठरलेल्या शहरातील स्वच्छता – सौंदर्यीकरणासाठी महापालिकेने जोरदार कंबर कसली आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये केडीएमसी सहभागी झाली असून त्याला आता लोकसहभागाचीही जोड मिळणार आहे.

कल्याण डोंबिवलीतील कचरा आणि स्वच्छतेची समस्येने अत्यंत उग्र रूप धारण केले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नही सुरू आहेत. मात्र ही समस्या कायमस्वरुपी सुटण्यासाठी शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासनाच्या ज्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे त्यादिशेने वाटचाल सुरू झाल्याचे सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. शासनाच्या या स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पण शहरातील नागरिक, सामाजिक संस्था आणि महापालिका प्रशासनाकडून एकच री ओढली जात आहे.

या शासकीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाकडून आज कल्याण डोंबिवलीतील सर्व स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठीत संघटनांची बैठक घेण्यात आली. ज्यामध्ये एमसीएचआय कल्याण डोंबिवली, आयएमए कल्याण, रोटरी क्लब कल्याण, कल्याण हॉटेल असोसिएशन यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

स्वच्छ्ता- सौंदर्यीकरणासाठी पुढच्या दोन महिन्यात जाणीवपूर्वक प्रयत्न…

महापालिका प्रशासन आणि या सर्व सामाजिक संस्थांतर्फे टार्गेटेड प्रयत्न केले जाणार आहेत. शहरातील निर्माल्य गोळा करणे- प्रक्रिया करणे, प्लास्टिक गोळा करणे आदी कामांसाठी अनेक संस्थांनी सहभाग नोंदवला असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. तसेच शहरातील रस्त्यांवरील दुभाजक तसेच मुख्य चौकांचे सुशोभीकरण करण्याची जबाबदारी रोटरी आणि एमसीएचआयने घेतली असल्याची माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिली. तर काही सामाजिक संस्थांनी टॉयलेट उभे करून देखभाल दुरूस्तीची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली आहे. कल्याण डोंबिवलीच्या स्वच्छ्ता आणि सौंदर्यीकरणासाठी पुढच्या दोन महिन्याचा काळात जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला कार्यकारी अभियंता अर्जुन अहिरे, सचिव संजय जाधव, घन कचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त अतूल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तर्डे, कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशन अध्यक्ष प्रविण शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

१ कॉमेंट

  1. आम्ही कल्याणात विदान इंन्फ्रा ह्याच कार्यात कार्यरत आहोत. या उपक्रमात जास्तित जास्त काम करायची आमची इच्छा आहे. प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा