Home क्राइम वॉच पोलिसांच्या खुर्चीवर बसून व्हिडिओ बनवण्याची हौस महागात; थेट लॉक अपमध्ये रवानगी

पोलिसांच्या खुर्चीवर बसून व्हिडिओ बनवण्याची हौस महागात; थेट लॉक अपमध्ये रवानगी

बांधकाम व्यावसायिकाचा डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यातील प्रकार

डोंबिवली दि. १ नोव्हेंबर :
हौसेला मोल नाही असं म्हणतात, मात्र ही हौस डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिकाला चांगलीच महागात पडल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम या सुप्रसिध्द प्लॅटफॉर्मसाठी थेट पोलीस ठाण्यातील, पोलीस अधिकाऱ्याच्याच खुर्चीवर बसून ‘इंस्टारील’ (व्हिडिओ) बनवण्याच्या हौसेमूळे या बांधकाम व्यावसायिकाला लॉक अपची हवा खावी लागली आहे.

डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक असणाऱ्या सुरेंद्र पाटील यांना इंस्टारीलसाठी व्हिडिओ करण्यासाठी उचललेलं पाऊल पाटीलच्या चांगलंच अंगलट आले आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या वेळी मानपाडा पोलीस ठाण्यात गेलेल्या या बांधकाम व्यावसायिकाने चक्क पोलिसांच्याच खुर्चीवर बसून रील बनविल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये कोणीही नव्हते, याचा फायदा घेत खुर्चीवर बसत स्वतःचे रिल बनविले. इतकेच नाही तर बंदूक हातात घेऊन नाचत असल्याचा दुसऱ्या ठिकाणचा आणखी एक व्हिडिओही त्याला जोडला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. विशेष म्हणजे इंस्टाग्रामवर त्याचे ९० हजारांहून अधिक फोलोअर्स असून त्याने आतापर्यंत ७०० व्हिडिओ पोस्ट केले आहेत.

दरम्यान हा व्हिडिओ मानपाडा पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि सुरेंद्र पाटीलला अटक केली आहे. सध्या स्वतःचे रिल (सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हिडियो) बनवण्याचे फॅड लोकांमध्ये वाढत आहे. हे व्हिडियो बनवण्यासाठी आणि ते व्हायरल होण्यासाठी लोकं कोणत्याही थराला जात असून आपल्या व्हिडिओसाठी युजर्स वाट्टेल ते करताना दिसत आहेत. ज्यामध्ये काही जणांनी आपला जीवही गमावला असून काही जणांना अशा प्रकारे पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. मात्र अशी जन्माची अद्दल घडूनही असे व्हिडिओ बनवणाऱ्यांची संख्याही कमी होताना दिसत नसून त्यांची हौसही काही फिटताना दिसत नाहीये.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा