Home Uncategorised कल्याणात बालवसतीगृहात अत्यंत वाईट पद्धतीने डांबून ठेवलेल्या 71 मुलांची सुटका

कल्याणात बालवसतीगृहात अत्यंत वाईट पद्धतीने डांबून ठेवलेल्या 71 मुलांची सुटका

 

कल्याण दि.26 नोव्हेंबर :
बालवसतीगृहाच्या नावाखाली लहान मुलांना अत्यंत वाईट पध्दतीने डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिमेत उघडकीस आला असून जिल्हा बाल कल्याण समितीने या वसतीगृहातून तब्बल 71 मुलांची सुटका केली आहे. याप्रकरणी बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडून बाजारपेठ पोलीस ठाण्यात संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीत पालकांनी त्यांच्या बाळाची डॉक्टरला 1 लाखांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी जिल्हा बालकल्याण समितीच्या तक्रारीवरून डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात हे बाळ विकणाऱ्या पालकांसह ते विकत घेणाऱ्या डॉ. केतन सोनीवर गुन्हाही दाखल करण्यात आहे. या प्रकरणातील बाळाला आपण कल्याणच्या नंदादीप संस्थेमध्ये ठेवल्याची माहिती डॉ. केतन सोनी यांनी जिल्हा बाल कल्याण समितीला दिली होती.

वसतीगृह नव्हे तर हा कोंडवाडा..

त्यानूसार या समितीच्या सदस्यांनी नंदादीप संस्थेच्या कल्याण पश्चिमेच्या पारनाका परिसरातील वसतीगृहाला भेट दिली आणि तिथले चित्र बघून त्यांना धक्काच बसला. आम्ही याठिकाणी पोहोचलो तेव्हा याठिकाणी 29 मुले होती. मात्र आणखी काही मुलांच्या बॅगा, कपडे, मुलींचे कपडेही याठिकाणी आढळून आल्याची माहिती ऍड.पल्लवी जाधव यांनी दिली. तिथल्या मॅनेजरकडे विचारणा केली असता आम्ही संस्थेत मुली ठेवत नाही असे उत्तर त्याच्याकडून देण्यात आले. तर तिथल्या मुलांकडे बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता आणखी काही मुलं मुली काल आमच्यासोबत होती, आम्ही एकत्रित जेवणही केले. पण सकाळी ते मुलं मुली कुठे गेले याची आम्हाला कल्पना नसल्याची माहिती या मुलांकडून देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. तर याठिकाणी एवढी मुलं असूनही केवळ 2 स्वच्छतागृह होती, मुलांच्या जेवणासाठीची व्यवस्थाही योग्य नव्हती आणि सर्वात मुख्य म्हणजे मुलांच्या स्वच्छतेची याठिकाणी कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचेही बाल कल्याण समितीला आढळून आले.

रात्री 11.30 वाजताच काही मुला मुलींना बाहेर नेण्यात आले..

त्यामूळे जिल्हा बालकल्याण समितीने बाजारपेठ पोलिसांशी संपर्क साधल्यावर पोलिसांच्या एका पथकाने या वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये रात्री 11.30 च्या सुमारास वसतीगृहातील काही मुला मुलींना झोपेतून उठवून बाहेर नेण्यात आल्याचे दिसून आले. या सर्व मुलांना नंदादीप संस्थेच्या शेजारी असणाऱ्या जुन्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील खोलीत डांबून ठेवल्याचे समजले. त्यावरून जिल्हा बाल कल्याण समिती आणि पोलिसांनी समजली त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तिथले चित्र बघून त्यांना मोठा धक्काच बसला.

अगदी छोट्याशा खोलीत अक्षरशः एकमेकांच्या अंगावर झोपली होती मुलं..

एका छोट्याशा खोलीमध्ये 2 ते 16 वयोगटातील 38 मुलं मुलींना अत्यंत दाटीवाटीने याठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते. अगदी छोट्या जागेत ही सर्व मुलं अक्षरशः एकमेकांच्या अंगावर थर रचावेत तशी झोपली होती अशी माहिती ऍड. पल्लवी जाधव यांनी दिली. यातील काही जणांच्या अंगावर कपडेही नव्हते तर काही जणांना स्किन इन्फेक्शन झाल्याचे दिसून आल्याचेही त्या म्हणाल्या. या सर्व मुलांना आम्ही व्यवस्थितपणे तिथून बाहेर काढले आणि वयानुसार शासकीय मान्यताप्राप्त संस्थांमध्ये त्यांची रवानगी केली आहे. या सर्व मुलांची आता अत्यंत योग्यप्रकारे देखभाल केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मुलांच्या निवासाची संस्थेकडे परवानगी नाही…

साधारणपणे 2018 पासून ही संस्था कार्यरत असून या संस्थेकडे मुलांच्या रहिवासासाठी आवश्यक असणारी शासकीय परवानगी नसल्याचेही आम्हाला आढळून आल्याचे सांगत लवकरच या सर्व मुलांच्या पालकांशी संपर्क साधून बोलावले जाणार असल्याचे ऍड. जाधव यांनी सांगितले. तर या संस्थेकडून या मुलांचे नेमके काय केले जायचे याबाबत पुढील तपासामध्ये स्पष्ट होईल.

आपले बाळ नको असेल किंवा बाळ दत्तक घ्यायचे आहे तर..

दरम्यान एखादी व्यक्ती किंवा पालकांना आपले बाळ नको असेल तर त्यांनी ते कायदेशीररित्या शासनाकडे सुपूर्द करावे. जेणेकरून ते बाळ मूळ प्रवाहात येईल आणि अवैधपणे किंवा मानवी तस्करीसाठी त्याचा कोणत्याही प्रकारे वापर होणार नाही. सध्या मुलांसोबत विचित्र घटना घडत आहेत की जिकडे लहान मुलांचा वापर सर्वाधिक होतोय. ज्या पालकांना बाळ दत्तक घ्यायचे असेल त्यांनी शासनाच्या cara.nic (कारा) या लिंकवर जाऊन नोंदणी केल्यास ते कायदेशीररित्या बाळ दत्तक घेऊ शकतील असे आवाहन यावेळी बाल संरक्षण अधिकारी ऍड. पल्लवी जाधव यांनी केले आहे.

तर या सर्व भयंकर प्रकारावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याठिकाणी असणारी मुलं नेमकी कोणाची मुलं आहेत? त्यांना याठिकाणी त्यांचे आई वडील सोडून गेले आहेत की डोंबिवलीतील प्रकाराप्रमाणे त्यांचीही खरेदी विक्री झाली आहे? या मुलांचा नेमका कशासाठी वापर केला जात होता? एवढ्या मोठ्या संख्येने मुलं असूनही शासकीय यंत्रणांचे त्यांच्याकडे लक्ष का गेले नाही? या सर्व प्रकारात आणखी कोणी बडे मासेही सहभागी आहेत का? यासारखे अनेक प्रश्न आता समोर आले असून शासकीय यंत्रणा त्या प्रश्नांच्या मुळाशी जाते की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा