Home ठळक बातम्या कल्याणमध्ये एकाच इमारतीत पोलिसांची प्रशासकीय कार्यालये उभारा – आमदार विश्वनाथ भोईर

कल्याणमध्ये एकाच इमारतीत पोलिसांची प्रशासकीय कार्यालये उभारा – आमदार विश्वनाथ भोईर

अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली मागणी

कल्याण दि. 16 मार्च :

कल्याण स्टेशनजवळ पोलिस विभागाची मोठी जागा असून याठिकाणी एकाच इमारतीमध्ये स्थानिक पोलीस ठाण्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची कार्यालये उभारण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. सध्या सुरू असणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते बोलत होते.

कल्याण स्टेशनजवळ एकच प्रशस्त इमारत बांधा…

कल्याण स्टेशन परिसरात कोर्टाच्या समोर महात्मा फुले पोलीस ठाण्याची जुनी इमारत आहे. तर कोर्टाच्या दुसऱ्या बाजूला कल्याण शहर एसीपी कार्यालयासह ट्रॅफिक ऑफिसचेही कार्यालय आहे. ही दोन्ही कार्यालये आता साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षे जुनी झाली असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच याठिकाणी पोलीस विभागाची मोठी जागा असून या जागेवर एक प्रशस्त इमारत बांधून त्या एकाच इमारती स्थानिक पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा, एसीपी ऑफिस आणि डीसीपी ऑफिस उभारण्याची मागणी आमदार भोईर यांनी यावेळी केली. सध्याचे महात्मा फुले पोलीस ठाण्याची इमारत ही दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर स्टेशन परिसरात एकाच इमारतीत ही सर्व कार्यालये आल्यास सुरक्षेच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने ते अधिक परिणामकारक ठरेल असेही आमदार भोईर यांनी सभागृहात मांडले.

एनआरसी कामगारांची थकीत देणी द्यावीत…
पोलीस ठाण्याच्या इमारतीसह आमदार भोईर यांनी एनआरसी कंपनीतील कामगारांच्या थकीत देण्यांचा प्रश्नही सभागृहात उपस्थित केला. या कंपनीतील हजारो कामगारांची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावली असून शासनाने तातडीने याप्रकरणी हस्तक्षेप करून कामगारांना ही देणी मिळवून देण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीला निर्देश द्या…
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नागरिकांची भविष्यातील पाण्याची गरज पाहता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतंत्र धरणाची मागणी केली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून धरण प्रत्यक्षात यायला आणखी काही कालावधी लागेल. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केडीएमसी प्रशासनाला निर्देश देऊन सध्या मतदारसंघात निर्माण झालेली पाणीबाणी सोडवण्याची मागणीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा