Home क्राइम वॉच कचोरेच्या गावदेवी मंदिरातील चांदीच्या पादुका चोरीला ; सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद

कचोरेच्या गावदेवी मंदिरातील चांदीच्या पादुका चोरीला ; सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद

टिळक नगर पोलिसांकडून चोरांचा शोध सुरू

कल्याण दि.23 मार्च :
कल्याण पूर्वेच्या पत्रीपुला पलिकडे रेल्वे समांतर रस्त्यावर असणाऱ्या कचोरे येथील गावदेवी मंदिरात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडला आहे. दोघा अज्ञात चोरट्यांनी काल दुपारी मंदिरात जाऊन देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्या आहेत. हा सर्व प्रकार मंदिर आणि परिसरात बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चोरटे आले देवीची पूजा केली आणि…
शुक्रवारी दुपारी पावणे दोन ते दोन वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसत आहे. दुपारी मंदिर परिसर आणि मंदिरात कोणीही नसल्याची संधी साधत या दोघा चोरट्यांनी ही चोरी केली.
दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा आत शिरला, त्याने देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा त्याचा दुसरा साथीदारही आतमध्ये आला. त्यानेही देवीची पूजा अर्चना केली, नमस्कार केला. आणि मग हळूच इकडे तिकडे बघत देवीच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या चांदीच्या पादुका उचलून दोघांनीही तिकडून धुम ठोकली. या चांदीच्या पादुकांची किंमत अंदाजे 30 हजार रुपये इतकी आहे.

पाहा व्हिडिओ खालील लिंकवर…
https://www.instagram.com/reel/C413BdcCZAm/?igsh=cTU2Y2tyN2x4bXVu

संध्याकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ देवीच्या पूजेसाठी गेले असता त्यांना देवीसमोर चांदीच्या पादुका नसल्याचे आढळले. त्याबाबत त्यांनी तातडीने इतर ग्रामस्थांना कळवले आणि तेही मंदिरात दाखल झाले. या सर्वांनी मंदिर परिसरात शोध घेतला परंतु त्यांना पादुका आढळून आल्या नाहीत.

अखेर सी सी टी व्ही फूटेज तपासल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा