Home ठळक बातम्या म्हाडा अधिकाऱ्याच्या तब्बल 7 नातेवाईकांना एकाच वेळी घराची लॉटरी; आमदार राजू पाटील...

म्हाडा अधिकाऱ्याच्या तब्बल 7 नातेवाईकांना एकाच वेळी घराची लॉटरी; आमदार राजू पाटील यांची चौकशीची मागणी

 

डोंबिवली दि.3 मार्च :
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मौजे खोणी येथील म्हाडाच्या (Maharashtra Housing and Area Development Authority _ MHADA) गोल्डन ड्रीम प्रोजेक्टमधील सदनिकांच्या सोडतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. म्हाडा (MHADA) अधिकाऱ्याच्या एक दोन नव्हे तर तब्बल 7 नातेवाईकांना लॉटरीमध्ये घरे लागली असून सोडतीमध्ये एकाच वेळी इतके घरे लागलीच कशी असा प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष तसेच सीईओ असणाऱ्या मिलिंद म्हैसकर यांना आमदार पाटील यांनी पत्र पाठवले असून याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.

कल्याण ग्रामीण भागातील खोणी येथे म्हाडाकडून गोल्डन ड्रीम प्रोजेक्टअंतर्गत गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. सोडतीच्या एकाच दिवशी या आर्चीड इमारतीमधील 7 सदनिकांची लॉटरी म्हाडा अधिकाऱ्याच्या 7 नातेवाईकांच्या नावे निघाल्याचे सांगत यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली आहे. म्हाडामध्ये अधिकारी असणाऱ्या छाया राठोड (चव्हाण) यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःला आणि नातेवाईकांना फायदा करून दिला असण्याची शक्यता एकंदर परिस्थितीवरून नाकारता येत नसल्याचे सांगत इतर काही अधिकाऱ्यांनीही अशाच प्रकारे पदाचा गैरवापर केल्याची शक्यता आमदार पाटील यांनी वर्तवली आहे.

या ऑर्चीड इमारतिमधील या 7 सदनिका छाया राठोड यांच्या बहिणीचा पती, चुलत भाऊ, बहिण्याच्या पतीची बहिण, सावत्र भाऊ, सख्खा भाऊ, वडील आणि भाचा या नातेवाईकांना लिलावाद्वारे प्राप्त झाल्या आहेत. या सर्वांना एकाच दिवशी झालेल्या सोडतीमध्ये लॉटरी लागल्याचेही आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे.
या सोडतीत घोटाळा झाल्याची शक्यता व्यक्त करत अशाप्रकारे याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी मिलिंद म्हैसकर यांच्याकडे केली आहे. याबाबत आता म्हाडा प्रशासन आणि राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा