Home क्राइम वॉच ..म्हणून कल्याणात 200 पोलीस अधिकारी – कर्मचारी उतरले रस्त्यावर

..म्हणून कल्याणात 200 पोलीस अधिकारी – कर्मचारी उतरले रस्त्यावर

रूट मार्च काढत समाजकंटकांना दिला इशारा

कल्याण दि.17 सप्टेंबर :
कल्याणात आज थोडे थोडके नव्हे तर तब्बल 200 च्या आसपास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एकत्रितपणे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. निमित्त होते ते आगामी गणेशोत्सवासह प्रमूख सणांच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या रूटमार्चचे. उत्सव काळात समाजात कायदा – सुव्यवस्था अबाधित राहावी आणि समाजकंटकांवर वचक बसवण्याच्या उद्देशाने पोलीस प्रशासनाकडून हा रुट मार्च काढण्यात आला. (Police route march in kalyan ahead of ganapti festival)

22 अधिकारी आणि 170 कर्मचाऱ्यांचा सहभाग…
पोलिस परिमंडळ 3 उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली 21 अधिकाऱ्यांसह 170 कर्मचारी सहभागी झाले होते. शहरातील महत्त्वाचे चौक, महत्त्वाच्या रस्त्यांसह गणेश विसर्जन मार्गावर हा रूटमार्च काढण्यात आला. सणासुदीच्या काळात पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. सण उत्सव काळात समाजकंटकांकडून कायदा – सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून हा रूट मार्च काढत एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले जाते.

कल्याण पूर्व – पश्चिमेत याठिकाणी झाला हा मार्च…
कल्याण पश्चिमेतील वालधुनी जकात नाक्याजवळून सुरुवात होऊन वालधुनी ब्रिज, सुभाष चौक, महात्मा फुले चौक, मोहम्मद अली चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौक, गांधी चौक, दूध नाका, पारनाका, टिळक चौक, दक्षिणमुखी मारुती मंदिर, आग्रा रोड, असलेला सहजानंद चौक, काळी मशीद, पत्रीपूल मार्गे कल्याण पूर्वेकडील चक्की नाका, काटेमानिवली नाका, खडेगोळवली, कैलास नगर, चिंचपाडा, गॅस गोडाऊन कंपनी, साकेत कॉलेज, शंभर फुटी रोडमार्गे कल्याण मलंगगड रोडला असलेल्या नांदिवली तलावाजवळ हा रूट मार्च समाप्त करण्यात आला.

रायफलधारी जवानांचाही सहभाग…
या रूट मार्चमध्ये कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्यासह महात्मा फुले चौक, बाजारपेठ, कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. यात 13 पोलिस वाहने, 4 खासगी ओपन जीप, आरसीपी मोबाईल व्हॅन, वज्र मोबाईल व्हॅन, क्यूआरटी मोबाईल व्हॅन, एसआरपी 1 प्लॅटून, बीट मार्शल्ससह रायफलधारी जवानांचा समावेश होता.

आगामी गणेशोत्सवासह इतर सण शांततेत-जातीय सलोखा राखून साजरे करावेत. हे सण साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही आणि सणांना गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठेही काहीही अनुचित प्रकार घडत असल्याचे दिसल्यास त्वरित पोलीस प्रशासनाला त्याची माहिती देण्याचे आवाहन यावेळी डी सी पी सचिन गुंजाळ यांनी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा