Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतून हजारो गणेश भक्त कोकणाकडे रवाना

कल्याण डोंबिवलीतून हजारो गणेश भक्त कोकणाकडे रवाना

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून सुटल्या 580 मोफत बसेस

कल्याण डोंबिवली दि.17 सप्टेंबर :
गणपतीला कोकणात जाण्यासाठी ऐरव्ही गाडीचे तिकीट मिळेल की नाही या चिंतेत असणारे हजारो चाकरमानी काल कल्याण आणि डोंबिवलीतून हसतमुखाने आपल्या कोकणाच्या दिशेने रवाना झाले. निमित्त होते ते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राबवलेल्या मोफत बस उपक्रमाचे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून काल एकाच दिवशी कोकणाच्या दिशेनं तब्बल 580 बसेस सोडण्यात आल्या.

कोकणवासियांसाठी गणेशोत्सव म्हणजे जीव की प्राण. काहीही झाले तर गणपतीला कोकणात जाणारच. मात्र गेल्या काही वर्षात ट्रेन्सचे न मिळणारे आरक्षण, खासगी बसेसचे मनमानी भाडे आदींमुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागायचे. कोकणवासियांचा हा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. यांच्याकडून गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी 190 मोफत बसेसची असणारी ही संख्या यंदा तब्बल 580 वर जाऊन पोहोचली आहे. यावरूनच या उपक्रमाला कोकणवासियांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज येऊ शकतो.

या ठिकाणांहून सुटल्या इतक्या बसेस…
डोंबिवलीतून २७५ बस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांमध्ये सोडण्यात आल्या. ज्यापैकी डोंबिवली पश्चिमेच्या ठाकुर्ली रेल्वे मैदानावरुन 144 बसेस सोडण्यात आल्या. तर डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातून 131 बसेस सोडण्यात आल्या. तसेच कल्याण पूर्वेच्या १०० फुटी रस्त्यावरुन, कोळसेवाडीच्या ड प्रभाग कार्यालयासमोरुन उर्वरित बसेस सोडण्यात आल्या. खासदार डाॅ. शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या बसेस कोकणच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.

कल्याण डोंबिवलीतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार…
गेल्या वर्षभरात हिंदू सणांवर असणारी सर्व निर्बंध दूर करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केले आहे. त्यासोबतच राज्यामध्ये विकासाचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहेt. कल्याण डोंबवलीतही पायाभूत सुविधांचे जाळे तयार करण्यात येत असून आतापर्यंत 300 कोटींपेक्षा जास्त निधी रस्त्यांसाठी देण्यात आला आहे. तर येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

विरोधकांचाही घेतला समाचार…
काही लोकांना हिंदू सण आणि सनातन धर्माची ॲलर्जी झालीय. सनातन धर्म हा आपली उत्पत्ती असून त्याला संपवण्याची भाषा करणाऱ्या व्यक्तींसोबत जाण्याचे काम काही जण करत आहेत. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी गर्व से कहो हम हिंदू है चा नारा दिला त्यांचेच वंशज सनातन धर्म संपवणाऱ्यांचे स्वागत करतात यापेक्षा अधिक दुर्दैव काय असेल अशा शब्दांत खासदार डॉ. शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा