Home क्राइम वॉच कल्याण परिमंडळ पोलिसांची दमदार कामगिरी; तब्बल ८ कोटींचा मुद्देमाल तक्रारदारांना परत

कल्याण परिमंडळ पोलिसांची दमदार कामगिरी; तब्बल ८ कोटींचा मुद्देमाल तक्रारदारांना परत

 

डोंबिवली दि.१७ जानेवारी :
कल्याण पोलिसांकडून राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे एकीकडे पोलीस आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होत चाललेली. त्यातच आता कल्याण परिमंडळ पोलिसांकडून आयोजित एका कार्यक्रमानंतर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला थोडा थोडका नव्हे तर तब्बल सात कोटी ९४ लाखांचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना काल कल्याण परिमंडळ पोलिसांकडून परत करण्यात आला. आपल्या मेहनतीचे, कष्टाचे आणि हक्काच्या वस्तू परत मिळाल्याने या लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

आपली एखादी मौल्यवान वस्तू गहाळ झाली किंवा चोरीला गेल्यावर ती पुन्हा परत मिळण्याची अपेक्षा आणि आशा संबंधित व्यक्ती जवळपास सोडून देत असे. मात्र ही नकारात्मक परिस्थिती आणि चित्र बदलण्यासाठी पोलिसांकडून केल्या गेलेल्या उपाय योजना आता परिणामकारक ठरत आहेत. केवळ एखाद्या गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करण्यासोबतच संबंधित तक्रारदाराला त्याचा ऐवज लवकरात लवकर परत करण्यासाठी पोलिसांकडून पाऊले उचलली जात आहेत.

कल्याण परिमंडळ पोलिसांबद्दल बोलायचे झाले तर गेले संपूर्ण वर्ष त्यांनी वेगवेगळ्या किचकट गुन्ह्यांची अत्यंत कमी वेळेत उकल केली आहे. मग ते अपहरण, खंडणी, दरोड्यासारखे गुन्हे असोत की जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, वाहनचोरी, घरफोडीसारखे. या सर्वच गुन्ह्यांमध्ये कल्याण परिमंडळ ३ मधील सर्वच पोलीस ठाण्यांची एकापेक्षा एक सरस अशी कामगिरी दिसून आली आहे.

याच धडाकेबाज कामगिरीचा पुढचा अध्याय तब्बल ८ कोटींचा मुद्देमाल संबंधित तक्रारदारांना रेझिंग डे च्या निमित्ताने परत करून रचण्यात आला. ज्यामध्ये 21.6 तोळ्याचे सोन्याचे दागिने, 6 कोटी रुपयांची रोकड, 11 मोबाईल-लॅपटॉप, 12 वाहने, 14 टन सळई तर कल्याण विभागातील 41 लाख 55 हजार किमतीचे सोन्या- चांदीचे दागिने, 22 लाखांची रोकड, 4 मोबाईल-लॅपटॉप, 9 वाहने असा सर्व मिळून 7 कोटी 94 लाखांचा मुद्देमाल सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते हा सर्व मुद्देमाल मूळ मालकांना परत देण्यात आला. यावेळी अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुऱ्हाडे, कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्यासह संबंधित आठही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा