Home ठळक बातम्या कल्याणचा पतंग महोत्सव ठरला सांस्कृतिक एकतेचे प्रतीक; पोलीस आणि दिल दोस्ती ग्रुपचा...

कल्याणचा पतंग महोत्सव ठरला सांस्कृतिक एकतेचे प्रतीक; पोलीस आणि दिल दोस्ती ग्रुपचा पुढाकार

संक्रातीच्या सोबत साजरे झाले पोंगल, लोहरी आणि बिहू

कल्याण दि.१५ जानेवारी :
कोवीडमूळे दोन वर्षांच्या खंडानंतर साजरी झालेली आजची मकरसंक्रांत कल्याणकरांसाठी काहीशी स्पेशल ठरली. निमित्त होते ते कल्याण पश्चिमेच्या गांधारी परिसरातील रिंगरोडवरील अनोख्या पतंग महोत्सवाचे. कल्याणातील दिल दोस्ती ग्रुपतर्फे आयोजित हा पतंग महोत्सव कल्याणकरांच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक म्हणून साजरा झाल्याचे दिसून आले. संक्रांतीसोबतच याठिकाणी आसाम राज्यातील बिहु, पंजाबमधील लोहरी आणि दक्षिण भारतातील पोंगल हे सणही एकाच ठिकाणी साजरे करण्यात आले.

पतंग महोत्सवामध्ये दिड ते दोन हजार नागरिक सहभागी…

कल्याणातील दिल दोस्ती ग्रुप हा आपल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रमांसाठी सुपरिचित आहे. याच ग्रुपच्या पुढाकाराने आणि कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हॅपी स्ट्रीटसारखे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर दिल दोस्ती ग्रुप आणि कल्याण पोलिसांच्या सहकार्याने आज पहिल्यांदाच पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आणि या पहिल्या वहिल्या पतंग महोत्सवाला नागरिकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत तो कमालीचा यशस्वी करून दाखवला. विशेष म्हणजे पतंग उडवण्यासाठी याठिकाणी नायलॉन मांजाऐवजी साध्या पद्धतीच्या मांज्याचा वापर करण्यात आला. तसेच शहराच्या वर्दळीच्या ठिकाणाऐवजी रिंग रोडसारख्या मोकळ्या जागेत हा महोत्सव साजरा झाल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम जाणवले नाहीत. तर पतंग महोत्सवामध्ये जवळपास दिड ते दोन हजार नागरिकांनीही अत्यंत उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले. केवळ लहान मुलंच नाही तर त्यांचे आई वडिल, मित्र मंडळी, शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांसोबत पोलीस बांधवांनीही याठिकाणी पतंग उडवण्याचा आनंद लुटला.

 

तर या एकाच ठिकाणी नागरिकांनी संक्रांतीसोबत देशाच्या इतर राज्यांतील विविध सण साजरे करून सांस्कृतिक एकतेचा अनोखा संदेशही दिला. मकरसंक्रांतीच्या जोडीला याठिकाणी नागरिकांनी दक्षिण भारतातील पोंगल, आसाममधील बिहू आणि पंजाबमधील लोहरी हे सणही तितक्याच प्रेमाने साजरे झाल्याचे दिसून आले.

कल्याण शहराची सांस्कृतिक ओळख जपणार – डीसीपी सचिन गुंजाळ 

कल्याणसारख्या सांस्कृतीक शहरात पोलीस आणि नागरिक यांच्यात सहयोगाची भावना निर्माण होण्यासाठी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून हॅपी स्ट्रीटसारखे उपक्रम आम्ही राबवले आहेत. आज संक्रांतीसोबत लोहरी, बिहू पोंगल असे विविध राज्यांतील महत्वाचे सणही साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर विविधतेत एकता ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन दिल दोस्ती ग्रुप आणि खडकपाडा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून हा पतंग महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती कल्याण परिमंडळ ३ चे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी एलएनएनशी बोलताना दिली. तर लोकांची आणि पक्ष्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शहराबाहेर हा उत्सव साजरा होत असून कल्याण शहराची सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी असे विविध प्रकारचे उत्सव येत्या काळात आयोजित करणार असल्याचेही डीसीपी गुंजाळ यांनी सांगितले.

पोलीस – नागरिकांच्या मदतीने नव्या शहराची बांधणी – प्रशांत अहिरे, दिल दोस्ती ग्रुप

तर आताचे हे जुने कल्याण राहिले नसून हे नविन सांस्कृतिक कल्याण गेल्या दिड वर्षांत उभे राहताना दिसत आहे. येत्या काळात आपण पोलीस आणि नागरिक यांच्या सहकार्याने वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम आम्ही राबवणार आहोत. आणि कल्याण शहराची पुन्हा एकदा सांस्कृतिक शहर म्हणून वेगळी ओळख निर्माण करणार असल्याची प्रतिक्रिया दिल दोस्ती ग्रुपच्या प्रशांत अहिरे यांनी दिली.

यावेळी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील, दिल दोस्ती ग्रुपचे विजय इंगळे, सीए कौशिक गडा , बांधकाम व्यावसायिक विमल ठक्कर, उद्योजक रवी जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा