Home ठळक बातम्या कल्याण तळोजा मेट्रोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात ; मेट्रो १२ प्रकल्प आणखी गतिमान

कल्याण तळोजा मेट्रोचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात ; मेट्रो १२ प्रकल्प आणखी गतिमान

कल्याण डोंबिवली दि.४ नोव्हेंबर :

कल्याण, डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला थेट मुंबई, नवी मुंबई आणि तळोजाशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी कल्याण – तजोळा या मेट्रो१२ (metro 12)प्रकल्पाला गती मिळाली आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने हाती घेण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्यानंतर एमएमआरडीएच्या माध्यमातून या प्रकल्पाचे तातडीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. हे सर्वेक्षण आता अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसात हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर त्यापुढील कामांना लवकरच सुरूवात केली जाईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

म्हणून या मेट्रो मार्गाची जलदगतीने उभारणी महत्वाची…

मुंबईसह ठाणेपल्याडची कल्याण, डोंबिवली ही शहरे मेट्रो मार्गाने जोडून त्यांना वाहतुकीची नवी साधने उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध मेट्रो मार्गांची उभारणी केली जात आहे. या मार्गांमुळे लवकरच या भागातील प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाचा विस्तारीत भाग असलेल्या कल्याण – डोंबिवली – तळोजा ( मेट्रो १२) या मार्गाकडेही एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सुरुवातीपासूनच या मेट्रो मार्गासाठी आग्रही राहिले आहेत. या मेट्रो मार्गामुळे मुंबई, उपनगरातून ठाण्यात येणारा प्रवासी आणि ठाणे शहरातला प्रवासी भिवंडी, कल्याण आणि थेट तळोजा तसेच नवी मुंबईला जोडला जाणार आहे. यासोबतच कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील, शेजारच्या अंबरनाथ तालुक्यातील शहर आणि गावांतील प्रवासी थेट ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईला जाऊ शकणार आहेत. त्यामुळे मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते कल्याण तसेच थेट नवी मुंबई असा सलग प्रवास विनासायास आणि आरामदायी पद्धतीने करता येईल. त्यामुळे या मार्गाची जलदगतीने उभारणी महत्वाची असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

येत्या २० नोव्हेंबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात…

दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या एमएमआरडीए बैठकीत या प्रकल्पाला गती देण्याचे आवाहन केल्यानंतर एमएमआरडीए महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. याकाळात प्रकल्पासाठी सामान्य सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करत गेल्याच महिन्यात या मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरूवात झाली. आता या सर्वेक्षणाचे बहुतांश अंतिम टप्प्यात आले असून येत्या २० नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण होऊन त्यानंतर या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

असा असेल मेट्रो १२ प्रकल्प…

कल्याण तळोजा ही मेट्रो मार्गिका ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गिकेला जोडली जाणार आहे. त्यामुळे ठाणे ते तळोजा हे कल्याणमार्गे अंतर सहजरित्या कापता येणार आहे. हा मार्ग एकूण २०.७५ किलोमीटर लांबीचा असून यात १७ मेट्रो स्थानके असणार आहेत. कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समितीपासून हा मार्ग सुरू होणार आहे. तर पुढे डोंबिवलीतील विविध गावे आणि मानपाडा मार्गे कल्याणच्या ग्रामीण भागातून हा मेट्रो मार्ग जाईल. तळोजा हे या मार्गातील अंतिम स्थानक असून या मार्गामुळे शहरी भागासह ग्रामीण भागही मेट्रोला जोडला जाणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा