Home ठळक बातम्या दिवस – रात्रीच्या तापमानातील दुप्पट फरकाने नागरीकांच्या डोक्याला ताप

दिवस – रात्रीच्या तापमानातील दुप्पट फरकाने नागरीकांच्या डोक्याला ताप

दिवसा जाणवतोय असह्य उकाडा तर रात्रीला पडतेय थंडी 

कल्याण डोंबिवली दि.6 नोव्हेंबर :
एकीकडे दिवाळीच्या मध्यापासून गुलाबी थंडीची चाहूल लागली असली तरी गेल्या तीन चार दिवसांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच चढलेला दिसत आहे. रात्रीला आल्हाददायक गारठा तर दिवसा चटके देणारे ऊन अशा एकाच वेळी जाणवणाऱ्या परस्परविरोधी वातावरणामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

दिवाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत आपले बस्तान मांडून बसलेल्या वरुण राजाने काढता पाय घेतला आणि गुलाबी थंडीचे चोर पावलाने कधी आगमन झाले ते कळलेच नाही. त्यामुळे साहजिकच लांबलेल्या पावसाळ्याला कंटाळलेल्या नागरिकांना हा सुखद धक्का होता. उत्तर पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गुलाबी थंडीची चाहूल लागली असली तरी गेल्या तीन चार दिवसांपासून वाढत्या तापमानाने नागरिकांना नकोसे करून सोडले आहे.

कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहर परिसरात दिवाळीपासून तापमानात लक्षणीय घट झाली असून 16 ते 17 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवण्यात आल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. तर बदलापूर पश्चिम परिसरात तर काल शनिवार 5 नोव्हेंबर रोजी 14.5 अंश सेल्सिअस इतके नीच्चांकी तापमान नोंदवण्यात आले.

एकीकडे किमान तापमानात घट होत असतानाच गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कल्याण डोंबिवली, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, बदलापूर, कर्जत, मनोर आदी परिसरात तर दिवस आणि रात्रीच्या तापमानात दुपटीहून अधिक फरक जाणवत आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये काल दिवसा 36.7 अंश सेल्सिअस इतक्या कमाल (Maximum) तर रात्री 16.9 अंश सेल्सिअस इतके किमान (MiNimum) तापमान नोंदवण्यात आल्याची माहितीही अभिजीत मोडक यांनी दिली आहे. तसेच येणाऱ्या संपूर्ण आठवड्यात कमाल तापमान हे 34 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. तर किमान तापमानात थोडी वाढ वाढत होताना दिसेल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान दिवस आणि रात्री जाणवणाऱ्या या दुप्पट फरकाने नागरीकांच्या डोक्याला चांगलाच ताप झाला आहे. विशेषकरून लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर या परस्पर विरोधी हवामान बदलाचा अधिक परिणाम जाणवत आहे.

आज नोंदवण्यात आलेले किमान (Minimum) तापमान

कल्याण – 17.2
डोंबिवली – पनवेल – 17.4
बदलापूर – 15
कर्जत – 15.2
तलासरी – 15.4
मनोर – 16
उल्हासनगर – 17
ठाणे – 18.4
नवी मुंबई – 18.6

शनिवारी (5 डिसेंबर) नोंदविण्यात आलेले कमाल (max) तापमान

मुंबई – 36.6
नवी मुंबई – 36
ठाणे – 36.6
कल्याण – डोंबिवली – 36.7
उल्हासनगर – 36.5
बदलापूर – 36.5
मनोर – 36.1
कर्जत – 38

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा