Home क्राइम वॉच बनावट कागदपत्र सादर करून बांधलेल्या इमारतींवर कारवाई करा – केडीएमसी आयुक्तांचे आदेश

बनावट कागदपत्र सादर करून बांधलेल्या इमारतींवर कारवाई करा – केडीएमसी आयुक्तांचे आदेश

दिरंगाई केल्यास अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा

कल्याण – डोंबिवली दि. ११ नोव्हेंबर :
बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी घेऊन केडीएमसीसह राज्य शासनाच्या महरेरा संस्थेची फसवणूक प्रकरणी आता केडीएमसीही आक्रमक झाली आहे. बनावट कागदपत्र सादर करून बांधण्यात आलेल्या इमारतींवर तातडीने कारवाई करण्यासह गुन्हे दाखल करण्याचे आदेश केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिले आहेत. तसेच यामध्ये हलगर्जी किंवा दिरंगाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात दावा दाखल करत केडीएमसीकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर केडीएमसीने याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केल्यापासून या प्रकरणाने चांगलाच वेग घेतला आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून या प्रकरणाचा तपास केला जात असून केंद्र सरकारच्या ईडीनेही केडीएमसीकडून याप्रकरणी माहिती मागवली आहे.

मात्र कायदेशीर पातळीवर एवढ्या सर्व घडामोडी घडत असूनही बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधण्यात आलेल्या इमारतींवर मात्र कोणतीही कारवाई होत नसल्याची चर्चा सुरू होती. या पार्श्वभमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसाठी थेट लेखी आदेश जारी केले आहेत. सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी, प्रभाग क्षेत्र क्रमांक ७ह, ८ग, ९आय आणि १० ई यांना हे आदेश देण्यात आले आहेत.

आयुक्तांनी काय म्हटले आहे या आदेशांमध्ये…?

बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम करणाऱ्या ६७ प्रकरणांमध्ये नगरविकास विभागाने पडताळणी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ आणि महाराष्ट्र प्रदेश नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीप्रमाणे कायदेशीर कारवाई करून पूर्तता अहवाल त्वरित सादर करण्याचे यापूर्वीच आदेशित करण्यात आले आहे.

मात्र त्यानंतरही याप्रकरणी आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडून गुन्हे दाखल करणे किंवा बांधकाम निष्कासनाची कोणतीही कारवाई करण्यात आली नसून ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचेही आयुक्त डॉ. दांगडे यांनी त्यात नमूद केले आहे. तसेच या ६७ प्रकरणांमध्ये बांधकाम केलेल्या आणि रहिवासी मुक्त असलेल्या इमारतींवर निष्कासन कारवाई करून सर्व प्रकरणांमध्ये तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त डॉ. दांगडे यांनी दिले आहेत. तर या कारवाईमध्ये संबंधित अधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जीपणा केल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी यामध्ये दिला आहे.

दरम्यान याप्रकरणी एसआयटीने यापूर्वीच पाच जणांना अटक केली असून ८ संगणकांसह १६ बँक खातीही सिल केली आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा