Home कोरोना “म्युकरमायकोसिस’ला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्या” – आयएमए आणि केडीएमसीच्या वेबिनारमधील सूर

“म्युकरमायकोसिस’ला प्रतिबंध घालण्यासाठी सर्वतोपरी काळजी घ्या” – आयएमए आणि केडीएमसीच्या वेबिनारमधील सूर

 

कल्याण-डोंबिवली दि.14 मे :
कोरोनापाठोपाठ आपल्याकडे ‘म्युकर मायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराने डॉक्टरांपुढे नविन आव्हान उभे केले आहे. त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध घालणे हाच सर्वोत्तम उपाय असून त्यासाठी आवश्यक ती सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांच्या वेबिनारमध्ये करण्यात आले. इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ‘म्युकरमायकोसिस’वरील या महत्वपूर्ण वेबिनारचे आयोजन केले होते. (take-the-utmost-care-to-prevent-mucomycosis-ima-and-kdmc-webinar)

‘म्युकरमायकोसिस’ हा आजार डोकं वर काढत असून कल्याण डोंबिवलीतही त्याचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयएमए कल्याणने डॉ. अनिता मॅथ्यू आणि डॉ. मिलिंद नवलखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेबिनार आयोजित केला होता. ज्यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह ठाणे आणि मुंबईतील तब्बल 400 हून अधिक डॉक्टर सहभागी झाले होते.

‘म्युकरमायकोसिस’वर उपचार करण्याचे वैद्यकीय क्षेत्रापुढे मोठे आव्हान असून ते अत्यंत खर्चीकही आहे. तर त्यावरील शस्त्रक्रिया उपचार पद्धतही अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची असल्याने सध्या तरी त्याला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेणे हाच एकमेव पर्याय सध्या समोर असल्याचे मत या तज्ञ डॉक्टरांनी मांडले.

त्याचबरोबर कोवीड रुग्णांवर आवश्यकता नसल्यास पहिल्या आठवड्यात स्टिरॉइड्सचा वापर न करणे, आवश्यकता भासल्यास स्टिरॉइड्सचा योग्य आणि गरजेतितक्या प्रमाणात वापर करणे, रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवणे, म्युकरमायकोसिसच्या संशयित रुग्णांमध्ये योग्य चाचण्या आणि गरज भासल्यास आवश्यक शस्त्रक्रियात्मक मूल्यमापन करणे यासारखे महत्वपूर्ण मुद्दे यावेळी अधोरेखित करण्यात आल्याची माहिती इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.

केडीएमसीच्या स्मार्ट सिटी कार्यालयाच्या सभागृहात झालेला हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी कल्याण आयएमएच्या सचिव डॉ. इशा पानसरे, खजिनदार डॉ. सुरेखा इटकर, सहखजिनदार डॉ. राजेश राघवराजू, डॉ. विक्रम जैन, डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. अतुल पाटील आदीनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा