Home ठळक बातम्या ते जात आणि धर्माचे झेंडे घेऊन मतं मागताहेत, मात्र शेतकरी – कष्टकऱ्यांचा...

ते जात आणि धर्माचे झेंडे घेऊन मतं मागताहेत, मात्र शेतकरी – कष्टकऱ्यांचा कोणाला विचार नाही – आमदार बच्चू कडू यांची टिका

अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेला उपस्थिती

कल्याण दि.18 मे :

आजही आपण पाहतोय की माझ्या आया – बहिणीकडे स्वतःच घर नाही, मजुरीचे पैसे मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीये. आणि दुसरीकडे हे लोकं आपापल्या जाती – धर्माचे झेंडे घेऊन मतं मागत असल्याचे परखड मत प्रहार संघटनेच्या आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी ते कल्याण पश्चिमेच्या वासुदेव बळवंत फडके मैदानावर झालेल्या सभेला उपस्थित होते. सडेतोड शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या आमदार कडू यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी आणि विरोधकांवर चांगलेच आसूड ओढले.(They ask for votes with the flags of caste and religion, but nobody cares about the farmers – laborers – MLA Bachchu Kadu comments)

यंदाची ही लोकसभा निवडणुक म्हणजे उमेदवाराची नव्हे तर मतदारांची परीक्षा आहे. देश स्वातंत्र्य झाल्यापासून गेल्या 75 वर्षाचा इतिहास बघितला तर केवळ जाती – धर्माचीच स्पर्धा आणि जाती धर्माचेच गणित दिसून येईल. आज अनेक गरीब कष्टकऱ्यांना हक्काचे घर नाही, मजुरीचे पैसे मिळत नाहीत, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि आम्ही त्याच्यासमोर जाती धर्माचे झेंडे घेऊन मतं मागण्यासाठी हात जोडत असू तर ते हात छाटण्याची वेळ या निवडणुकीत मतदारांनी दाखवली पाहिजे असा घणाघात आमदार कडू यांनी यावेळी केला.

आजही लाखो लोकं फुटपाथवर झोपत असताना जाती धर्माच्या नावावर आम्ही हा राग दाबून टाकत असू तर आमच्यासारखे नालायक कोणीही नसल्याचे सांगत मुंबई कल्याणातील सहा लोकांकडे तब्बल सहा हजार एकर जमीन असल्याचा गंभीर आरोप बच्चू कडू यांनी आपल्या भाषणात बोलताना केला.

तर निलेश सांबरे यांनी प्रचंड असे काम उभे केले असून आपण उगाच त्यांच्या प्रचाराला आलेलो नाहीये. ही अशा गरीब कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची लढणारी फौज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उभी राहिली पाहिजे. दहा आंदोलनांची ताकद एका मतदानामध्ये असून ते मतदान ज्यादिवशी विकासकामांवर, मुद्द्यांवर , हुद्द्यावर होईल त्यादिवशी चित्र बदललेले असेल असा विश्वासही कडू यांनी यावेळी व्यक्त केला. आणि निलेश सांबरे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

या सभेला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे बंधू बबन जरांगे पाटील यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, खानदेश सेना अध्यक्ष, बळीराजा समिती, कुणबी एकत्रीकरण समिती अध्यक्ष आदी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा