Home ठळक बातम्या श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाच्या माध्यमातून डोंबिवली नगरी झाली बालाजीमय

श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाच्या माध्यमातून डोंबिवली नगरी झाली बालाजीमय

श्री बालाजी – भूदेवी आणि श्रीदेवीच्या पारंपरिक विवाह सोहळ्याने फेडले भक्तांच्या डोळ्यांचे पारणे

विवाह सोहळ्याच्या शोभायात्रेत उसळला हजारो भक्तांचा जनसागर

तिरुमला तिरूपती देवस्थान आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचा उपक्रम

डोंबिवली दि.25 फेब्रुवारी :
श्रीनिवासा गोविंदा…श्री व्यंकटेशा गोविंदा..गोविंदा हरी गोविंदाच्या नादब्रह्मात आज संपूर्ण डोंबिवली नगरी न्हाऊन निघाली. निमित्त होते ते तिरुमला तिरुपती देवस्थान आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे (mp Dr Shrikant shinde foundation) आयोजित श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाचे. येथील कल्याण शीळ मार्गावरील प्रीमियर कंपनी मैदानावर झालेल्या या अध्यात्मिक सोहळ्याने उपस्थित हजारो भक्तांना एका वेगळ्याच अध्यात्मिक आनंदाची अनुभूती प्राप्त झाली. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (dcm devendra fadanvis), विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे आणि राज्य सरकारमधील अनेक मंत्री हे प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यामूळे हजारो बालाजी भक्तांना रविवारी डोंबिवलीमध्ये तिरुपती येथील बालाजी यांचे दर्शन आणि विवाह सोहळा प्रत्यक्ष पाहता आला, अशी भावना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही यावेळी व्यक्त केली.

तिरुमला तिरुपती देवस्थान आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघातील सांस्कृतिक नगरी डोंबिवलीमध्ये दुसऱ्यांदा हा महोत्सव आयोजन करण्याचा मान मिळाला. तिरूपती हे देशातील भाविकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध ठिकाण असले तरी अनेकांना याठिकाणी जायला मिळत नाही. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने हा अतिशय भव्य दिव्य असा अध्यात्मिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे यासाठी तिरुपती बालाजी देवस्थान येथील पूजेची श्री बालाजी यांची मूर्ती आणण्यात आली होते. त्यासोबतच तिरुपती बालाजी देवस्थान येथील पुजारी आणि देवस्थानचे विश्वस्त, पदाधिकारीही या सोहळ्यासाठी डोंबिवलीत आले होते.

पहाटे व्यंकटेश सुप्रभातम् ने झाला महोत्सवाला प्रारंभ…
व्यंकटेश सुप्रभातम् स्तोत्राच्या अत्यंत पवित्र शब्दोच्चारणात श्रीनिवास कल्याणम् महोत्सवाला रविवारी सकाळी भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. ज्याप्रमाणे तिरुपती बालाजी देवस्थान येथे श्री बालाजी यांची पूजा अर्चा केली जाते. अगदी त्याच पद्धतीने आणि तितक्याच भावोत्कटतेने आज सकाळी या सोहळ्यात सुप्रभातम्, तोमाला, अर्चना आणि अभिषेक विधी संपन्न झाले. ज्यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक जण सपत्नीक सहभागी झाले होते.

महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य संस्कृतीचा शोभायात्रेत मिलाप…
श्रीनिवास कल्याणम् महोत्सवात श्री बालाजी आणि लक्ष्मी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त डोंबिवलीच्या सागर्ली येथील बालाजी मंदिरापासून ते प्रीमियर ग्राउंडपर्यंत पारंपरिक रथामध्ये भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये तिरुपती तिरुमला देवस्थान येथील दररोजच्या पूजेतील श्री बालाजी – श्री महालक्ष्मीच्या मूर्तीचा समावेश होता. या शोभायात्रेमध्ये एकीकडे महाराष्ट्रातील संत परंपरेचे जतन करणारा वारकरी संप्रदाय तर दक्षिण भारतातील अनेक धार्मिक रूढी परंपरा यांचे दर्शन घडवणारे देवाचे विविध अवतार, पुतळे बिदुरूगुंबे, हनुमान, शंकर, शेषनाग, नंदी, कलामयम उडपी, मंगलोर यक्षगण आदी पारंपरिक संस्कृती पाहायला मिळाली. या माध्यमातून याठिकाणी महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य संस्कृतीचा अनोखा मिलाप झालेला दिसला.

श्री बालाजी आणि महालक्ष्मी यांचा पारंपारिक विवाह सोहळा…
श्री श्रीनिवास कल्याणम् महोत्सवातील मुख्य सोहळा आणि त्याचे मुख्य आकर्षण असणाऱ्या श्री बालाजी आणि महालक्ष्मी यांच्या पारंपारिक विवाह सोहळ्याने उपस्थित हजारो भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. येथील प्रीमियर कंपनी मैदानावर हजारो बालाजी भक्तांच्या उपस्थितीत आणि तिरुपती येथील प्रमुख आचार्यांच्या मंत्रोच्चारात आणि अतिशय मंतरलेल्या वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न झाला. काकण बंधन, अग्नीसाक्षी, कार्यकारी संकल्प, मंगल वस्त्रअर्पण, कन्यादान, मंगळसूत्र बंधन अशा संपूर्ण विधिवत हा श्री बालाजी आणि श्री महालक्ष्मी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर नयनरम्य आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यासह विविध भागांतून हजारो भक्तांची गर्दी…
कल्याण शीळ मार्गावरील प्रीमियर मैदानावर झालेल्या या महोत्सवाला केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे , नवी मुंबईसह मुंबई आणि विविध भागांतून हजारो भक्त उपस्थित होते. ज्यामध्ये आबाल वृद्धांसह महिला भगिनींची लक्षणीय संख्या होती.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, गिरीश महाजन, कृषिमंत्री दादा भुसे, तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष करुणाकरन रेड्डी, कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी, बोर्ड मेंबर सत्यम, सौरभ बोहरा, आमदार बालाजी किणीकर , आमदार रविंद्र फाटक, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, पूर्वेश सरनाईक यांच्यासह या सोहळ्यासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा