Home ठळक बातम्या पत्रीपुल परिसरातील वाहतूक कोंडी : रात्रीच्या वाढीव वेळेत काम करण्यासह कामाचा वेग...

पत्रीपुल परिसरातील वाहतूक कोंडी : रात्रीच्या वाढीव वेळेत काम करण्यासह कामाचा वेग वाढवण्याचे एमएसआरडीसीला निर्देश

कल्याण दि.3 एप्रिल :
कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपूल परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीचा हजारो वाहन चालक आणि स्थानिकांना मोठा फटका बसत असून मंगळवारी एलएनएनकडून याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत केडीएमसी सिटी इंजिनिअर आणि एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी पत्रीपुल परिसरातील
या रस्तेकामाची संयुक्त पाहणी केली. त्यावेळी केडीएमसीच्या सिटी इंजिनिअर अनिता परदेशी यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्यांना रात्रीच्या वेळेत काम करण्यासह या कामाचा वेग अजून वाढवण्याचे निर्देश दिले.(Traffic Congestion in Patripul Area : kdmc city engineer Directs MSRDC to speed up work including night time work)

मोठया प्रमाणात वाहतूक कोंडीने नागरीक हैराण…
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा कल्याण शिळ रस्ता हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारित आहे. या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसीकडून केले जात असून सध्या पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांचे काम सुरु आहे. मात्र या कामामुळे पत्रीपुलाच्या दोन्ही बाजूला मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहन चालक आणि नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी निर्देश देत महापालिका, एमएसआरडीसी आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.

म्हणून कामाचा वेग आहे कमी…
एमएसआरडीसी मार्फत कल्याण शहरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम झालेले असून ज्या भागातील रस्त्याची कामे अपुर्ण आहेत ती सध्या हाती घेण्यात आली असल्याचे एमएसआरडीसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पत्रीपुलाच्या उतारावर पावसाळ्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात खड्डे पडत पुढील एक दीड महिन्याच्या कालावधीत हे काँक्रिटी करणाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी एमएसआरडीसीकडून देण्यात आली. तसेच या मार्गावर असलेल्या वाहनांच्या प्रचंड रहदारीमुळे रात्री केवळ १२ ते सकाळी 5 वाजेपर्यंतच काम करण्याची अनुमती असल्याने कामाचा वेग राखण्यात अडचणी येत असल्याचेही एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

केडीएमसी शहर अभियंत्यांनी केल्या या सूचना..
या ठिकाणी एकूण चार मार्गांचे काम असून पहिला मार्ग अंतिम टप्प्यात आहे. तसेच उरलेल्या 3 मार्गांची कामे ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करणेबाबत सूचना संबंधित अभियंता आणि ठेकेदार यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर कामाचा वेग तातडीने वाढविणे, कामासाठी रात्री १० ते सकाळी ८ वाजेपर्यंत एमएसआरडीसीला अनुमती देणे, वाहतुक कोंडीचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने वाढीव १५ ते २० ट्रॅफिक वॉर्डन शहर वाहतूक शाखेकडून उपलब्ध करण्याच्या महत्वपूर्ण सूचना केडीएमसी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिल्या आहेत.

याठिकाणी असलेल्या खड्डयांमुळे वाहतुकीस होणारा त्रास कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने हे काम होणे आवश्यक असल्याने त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व अशा आशयाच्या आवाहनाचे सुचना फलक लावण्याच्या सूचना महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी एमएसआरडीचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या.

या पाहणी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता अनिरुध्द बोर्डे, शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाट आणि त्यांचे प्रतिनिधी तसेच साकेत इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर गुरमे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा