Home ठळक बातम्या लागोपाठ चार गाड्या बंद पडल्याने पत्रीपूल परिसरात वाहतूक कोंडी

लागोपाठ चार गाड्या बंद पडल्याने पत्रीपूल परिसरात वाहतूक कोंडी

 

कल्याण दि.2 नोव्हेंबर :
कल्याणकरांसाठी आजचा दिवस चांगलाच डोकेदुखीचा ठरला आहे. पत्रीपूल परिसरामध्ये आज सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत लागोपाठ चार गाड्या बंद पडल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमूळे वाहन चालकांसह ट्रॅफिक पोलिस हैराण झाले. (Traffic jam in Patripool area due to four vehicles being stopped in a row)

कल्याणहून डोंबिवलीकडे किंवा नवी मुंबईला जाण्यासाठी पत्रीपूल अतिशय महत्त्वाचा समजला जातो. केवळ कल्याणच नव्हे तर शेजारील उल्हासनगर, अंबरनाथ , मुरबाड आदी परिसरातूनही शेकडो नागरिक दररोज या मार्गावरून ये जा करत असतात. मात्र आजच्या वाहतूक कोंडीमुळे या मार्गाची गती काहीशी मंदावल्याचे दिसून आले.

या मार्गावर बैल बाजारकडून नवी मुंबईच्या दिशेने जाणारा मल्टी एक्सल ट्रक पत्रीपुलाच्या चढणावरच बंद पडला आणि ऐन सकाळच्या वेळेस इथल्या वाहतूक कोंडीचा श्रीगणेशा झाला. याचा परिणाम दोन्ही दिशेने येणाऱ्या वाहतूकीवर झालेला पाहायला मिळाला. दुपारी दोन वाजून गेले तरीही हा ट्रक इथून हटवण्यात आला नव्हता. परंतु तो रस्त्याच्या कडेला उभा असल्याने त्याच्याबाजूने किमान गाड्या तरी जाऊ शकत होत्या.

दरम्यान हे ही कमी म्हणून की काय या ट्रक पाठोपाठ नंतर काही वेळांच्या अंतराने पत्रीपुलाहून बैल बाजारकडे येणाऱ्या मार्गावर घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणारी गाडी पत्रीपुलावरच बंद पडली. आणि मग बैल बाजारकडे येणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण झाला. हे होत नाही तर त्याच मार्गावर एक ब्रेक फेल झालेल्या ट्रकने या वाहतूक कोंडीत भर पडली. तर एक खासगी बसही बंद पडल्याचे दिसून आले. एकीकडे मेट्रो मॉलच्या चौकापर्यंत तर दुसरीकडे बैल बाजार स्मशानभूमीपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या होत्या.

दरम्यान अवघ्या काही मिनिटांच्या अंतरासाठी तासभर लागत असल्याने ऐन उन्हाच्या वेळेत वाहन चलाकांसह ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांना चांगलाच घाम फुटला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा