कल्याण दि. २ सप्टेंबर :
गणेशोत्सव काळात ऐतिहासिक आणि पौराणिक कथांवर आधारित चलचित्राचे देखावे हे कल्याणचे विशेष आकर्षण होते. जे पाहण्यासाठी पंचक्रोशीतून गर्दी व्हायची. मात्र काळाच्या ओघात लुप्त झालेली ही चलचित्रांची कला कल्याणातील एका मंडळाने आपल्या स्थापनेपासून जपली आहे. कल्याणच्या जुन्या गणेश मंडळापैकी एक असणाऱ्या उदय गणेश मंडळाने सादर केलेला चलचित्र देखावा लोकांच्या पसंतीस उतरला आहे.
कल्याणच्या गणपतींची कधी काळी व्हायची थेट पुण्याशी स्पर्धा…
कधी काळी थेट पुण्याशी स्पर्धा करणाऱ्या ऐतिहासिक कल्याण शहरातील गणेशोत्सवाचे स्वरूप गेल्या दोन दशकात मोठ्या प्रमाणात बदलले आहे. राज्याच्या सांस्कृतिक राजधानी पुण्यानंतर कल्याणातील देखावे लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचे. एकमेकांपेक्षा वेगळ्या आणि आकर्षक देखावे सादर व्हावे म्हणून गणेश मंडळांकडून काही महिन्यांपासून जय्यत तयारी केली जायची. तर जुने कल्याण म्हणजेच टिळक चौक, कासारहाट, पार नाका, गांधी चौक, बाजारपेठ आदी परिसर त्यावेळी चलचित्र देखाव्यांसाठी प्रसिद्ध होता. विविध पौराणिक किंवा ऐतिहासिक विषयांवर समाज प्रबोधनाचे काम या देखाव्यातून केले जायचे. जे पाहण्यासाठी केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर पुण्या मुंबईतूनही लोकं यायची.
१९५३ पासून जपला आहे चलचित्र देखव्यांचा वारसा…
चलचित्र देखाव्यांच्या त्या काळात नामांकित गणेश मंडळांमध्ये उदय गणेश मंडळाचाही दबदबा होता. इथला गणेशोत्सव आणि त्याच्या शेजारी साकारलेला चलचित्र देखावा पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी व्हायची. १९५३ मध्ये दिपाशेठ, सुधीर या हजारे बंधु आणि त्यांच्या मित्र मंडळींकडून उदय गणेश मंडळाची स्थापन झाली. परंतू गेल्या दोन दशकात गणेशोत्सवाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलले. उत्सवाची जागा कॉर्पोरेट इव्हेंटने घेतली आणि काळाच्या ओघात हे चलचित्र देखावेही जणू काही गणेशोत्सवासोबतच लोकांच्या मनातूनही हद्दपार झाले. मात्र उदय गणेश मंडळाने स्थापनेपासून उचललेला चलचित्र देखाव्याचा हा विडा आजतागायत कायम राखला आहे. यंदा या गणेश मंडळाचे ७० वे वर्ष असून त्यांच्या मुले आणि नातवंडांनीही चलचित्र देखाव्यांची सहा दशकांहून अधिक काळाची ही प्रथा जोपासली आहे. अपवाद केवळ कोरोना काळ आणि २००५ मध्ये कल्याणात आलेला महापूर या तीन वर्षांचा.
रामायण काळातील ‘अहिल्या शिळेचा’ प्रसंग चलचित्राच्या माध्यमातून जिवंत..
या मंडळाने यंदा रामायण काळातील ‘अहिल्या शिळेचा’ पौराणिक प्रसंग चलचित्राच्या माध्यमातून जिवंत केला आहे. आणि तो प्रसंग पाहण्यासाठी अनपेक्षितपणे लोकांची मोठी गर्दी होत आहे. उदय गणेश मंडळाने गेल्या सहा दशकांपासून जपलेला हा पारंपरिक वारसा यापुढेही नव्या पिढीला असाच प्रेरणादायी ठरो अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.