Home ठळक बातम्या रुग्णालयाबाहेर महिलेची प्रसूती : केडीएमसी आरोग्य विभागाबाहेर मनसेचे आंदोलन

रुग्णालयाबाहेर महिलेची प्रसूती : केडीएमसी आरोग्य विभागाबाहेर मनसेचे आंदोलन

तर घटनेची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करण्याचा आयुक्तांचा निर्णय

कल्याण दि.11 सप्टेंबर :
रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या महिलेच्या प्रसूतीनंतर आक्रमक झालेल्या मनसेने आज संध्याकाळी केडीएमसी आरोग्य विभागाबाहेर जोरदार आंदोलन केले. वैद्यकीय अधिकारी हाय हाय, केडीएमसी प्रशासन हाय हाय आणि रुख्मिणीबाई रुग्णालय बंद कराची जोरदार घोषणाबाजी करत मनसैनिकांनी आरोग्य विभागाच्या प्रवेशद्वार ओढणी बांधून बंद करून टाकले. तर घडलेल्या घटनेची चौकशी अतिरिक्त आयुक्तांमार्फत केली जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.

प्रसूतीकळा सुरू झालेल्या महिलेची रुख्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसूती झाल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला होता. या घटनेचा केडीएमसी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मनसैनिक आज महापालिका मुख्यालयात दाखल झाले होते. ज्यामध्ये महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती. या सर्वांनी केडीएमसी मुख्यालयातील आरोग्य विभाग गाठले. मात्र मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील या कार्यालयात उपस्थित नसल्याने केडीएमसी सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवून धरले. वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे समजताच मनसैनिक आणखीनच आक्रमक झाले. आणि त्यांनी वैद्यकीय अधिकारी हाय हायची एकच घोषणाबाजी झाली. तसेच आक्रमक झालेल्या मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाचे प्रवेशद्वार आपली ओढणी बांधून बंद केले. तसेच या प्रवेशद्वारावर शाल, पुष्पगुच्छ आणि ट्रॉफी अडकवून वैद्यकीय अधिकाऱ्यांबाबत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

दरम्यान या घटनेनंतर केडीएमसी अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की आपण किती खोटारडे आणि निर्लज्ज असल्याची टीका मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी केली. केडीएमसी आयुक्तांनी या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई केली तर ठीक आहे. मात्र तसे न झाल्यास त्यांची मनसेशी गाठ असून त्यांना मनसे स्टाईल इंगा दाखवला जाईल असा सज्जड दमही उल्हास भोईर यांनी यावेळी केडीएमसी प्रशासनाला दिला.

या घटनेची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी होणार – आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे

रुक्मिणीबाई रुग्णालयात घडलेल्या घटनेची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशीचे निर्देश दिले असून त्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे. तसेच रुग्णालय प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवणे आवश्यक असून अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. चौकशीअंती जे काही समोर येईल त्यानंतर दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा