Home ठळक बातम्या अखेर कल्याण डोंबिवलीतील खड्डे भरण्यास सुरुवात ; दिवस रात्र सुरू राहणार काम

अखेर कल्याण डोंबिवलीतील खड्डे भरण्यास सुरुवात ; दिवस रात्र सुरू राहणार काम

कल्याण डोंबिवली दि.11 सप्टेंबर :

गणपती येण्यासाठी अवघ्या आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मात्र गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे निर्देश केडीएमसी आयुक्तांना दिले होते. त्यानुसार रविवार रात्रीपासून कल्याण डोंबिवलीतील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. (Finally the filling of potholes in Kalyan Dombivli started; The work will continue day and night)

कल्याण डोंबिवलीतील मुख्य रस्ते असो की अंतर्गत, या सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यातून वाट काढताना वाहन चालक आणि नागरिकांची अक्षरशः कमलीची दमछाक होत आहे. त्यातच आता गणेशोत्सवही अवघ्या काही दिवसांवर आला असून त्यापूर्वीच कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डेमुक्त होतील असा विश्वास केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही त्यांनी तातडीने खड्डे भरण्याचे आदेश दिले होते.

त्यानूसार काल सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने केडीएमसीतर्फे खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व आणि डोंबिवलीत एकाच वेळी खड्डे भरण्याच्या कामांना सुरुवात झाल्याची माहिती शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी दिली आहे. तसेच पावसाने अशीच उघडीप दिल्यास आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे गणेशोत्सववापूर्वी कल्याण डोंबिवलीतील रस्ते खड्डेमुक्त होतील अशी अपेक्षाही अहिरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे भरण्यासाठी डांबर, कोल्डमिक्स, पेव्हर ब्लॉक आदी पर्यायांचा वापर केला जात असल्याचेही यावेळी केडीएमसी शहर अभियंत्यांनी सांगितले.

दरम्यान पावसाने घेतलेली विश्रांती आणि केडीएमसीने सुरू केलेल्या खड्डे भरण्याच्या कामामुळे काहीसा दिलासा मिळणार असला तरी वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या या खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा कधी निघणार असा सवाल कल्याण डोंबिवलीकर उपस्थित करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा