पै फ्रेंड्स लायब्ररीचा अनोखा उपक्रम
डोंबिवली दि.२३ एप्रिल :
अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळींचे केंद्रबिंदू असणाऱ्या डोंबिवलीतील फडके रोडला आज वेगळाच साज चढला होता. निमित्त होते ते जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून पै फ्रेन्ड्स लायब्ररीतर्फे राबवण्यात आलेल्या अनोख्या उपक्रमाचे. ज्यामुळे आज फडके रोडवर साक्षात पुस्तकांची गंगाच अवतरली होती. आणि या ज्ञान गंगेत केवळ हात धुण्यासाठी नव्हे तर डुंबून जाण्यासाठी हजारो वाचन प्रेमी अबाल वृद्धांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली.
200 मीटरच्या रस्त्यावर अवतरली पुस्तकांची नदी…
मदन ठाकरे चौक ते अप्पा दातार चौक या 200 मीटरच्या रस्त्यावर सुमारे एक लाखाहून विविध प्रकारची पुस्तके आखीव-रेखीव पध्दतीने मांडण्यात आली होती. वाचकप्रेमींना प्रत्येक पुस्तक पाहता आणि हाताळता यावे अशा पध्दतीच्या पायवाटा पुस्तक प्रदर्शनात करण्यात आल्या होत्या. ठाणे, कल्याण, बदलापूर, नवी मुंबई, आदी भागांतील दर्दी वाचक या उपक्रमात सहभागी झाले होते. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे पालकांबरोबर पाल्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
पहाटे ४ वाजल्यापासून वाचनप्रेमी रांगेत उभे…
बुक स्ट्रीटमध्ये आपला पहिला नंबर लागावा यासाठी अनेक वाचनप्रेमी पहाटे चार वाजल्यापासून फडके रोडवर हजर होते. रविवारी सकाळी आठपर्यंत जवळपास एक हजारांहून अधिक पुस्तकप्रेमींनी या बुक स्ट्रीटमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी केली होती. सध्या कडाक्याचे ऊन असल्यामुळे हा कार्यक्रम पहाटे 4.30 ते सकाळी 10 या पाच तासांचा ठेवण्यात आला होता. पुस्तक मांडणी पहाटे पूर्ण झाल्यानंतर उपस्थित पुस्तकप्रेमींना कुपन देऊन बुक स्ट्रीटमध्ये सोडण्यात आले. नऊ वाजेपर्यंत ५ हजारांहून अधिक पुस्तकप्रेमींनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी रांगा लावल्या होत्या. गर्दी होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने वाचकांना बुक स्ट्रीटवर सोडले जात होते. डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर, पै फ्रेन्ड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांच्या उपस्थितीत बुक स्ट्रीटचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमात सहभागी प्रत्येक वाचकाला त्याच्या आवडीचे पुस्तक भेट दिले जात होते.
परदेशांतील अनेक शहरांमध्ये साजरा होतो हा उपक्रम…
परदेशांतील अनेक शहरांमध्ये एक दिवस पुस्तक उपक्रम राबविला जातो. विशेष म्हणजे स्पॅनिश पुस्तकप्रेमी लुझ इंटरप्युटस यांची ही संकल्पना आहे. एक दिवस रस्त्यावरील वाहनांचा गोंगाट, प्रदूषण, गर्दी कमी करुन त्या ऐवजी तो दिवस साहित्यिक, वैचारिक देवाण-घेवाण, पुस्तकांचे अदान-प्रदान आणि शांतता यासाठी राखीव असला पाहिजे, या उद्देशातून लुझ यांनी रस्त्यावर पुस्तके मांडून ती वाचकांना भेट देण्याच्या निमित्ताने साहित्यिक मंथन घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, हा देखील उपक्रमाचा उद्देश होता. या उपक्रमाच्या निमित्ताने एक दिवस रस्तोरस्ती पुस्तके मांडली जातात. लोक उत्स्फूर्तपणे त्यांना आवडणारी पुस्तके पाहतात आणि घेतात. यानिमित्ताने एक पुस्तक भव्य मेळावा व्हावा, या विचारांनी प्रेरित झालेल्या पुंडलिक पै यांनी डोंबिवलीत प्रथमच आयोजित केलेल्या बुक स्ट्रीटला वाचक प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यासंदर्भात माहिती देताना पुंडलिक पै म्हणाले, जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यापेक्षा प्रत्यक्ष वाचकांचा सहभाग असलेला कार्यक्रम करावा. या उद्देशातून विदेशातील संकल्पनेप्रमाणे बुक स्ट्रीटचे आयोजन केले. त्याला पुस्तकप्रेमींनी भरभरुन प्रतिसाद दिला. असे उपक्रम नियमित केले तर नक्कीच वाचन संस्कृतीची मोठी चळवळ उभी राहील, असेही पै म्हणाले.
२०० स्वयंसेवकांकडून दिड लाख पुस्तकांची मांडणी…
आदल्या रात्रीपासून बुक स्ट्रीट उपक्रमासाठी फडके रोड झाडून स्वच्छ करण्यात आला होता. रस्त्यावर सतरंज्या टाकण्यात आल्या होत्या. पै फ्रेन्ड्स लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांसह विविध संस्थांचे जवळपास 200 स्वयंसेवक शनिवारी मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत दीड लाख पुस्तकांची मांडणी करत होते. यावेळी लहान मुलेही पालकांसमवेत आवर्जून उपस्थित होती. बुक स्ट्रीटमुळे फडके रस्त्यावरील गणेश मंदिराकडे जाणारी वाहने इतर रस्त्याने वळविण्यात आली होती.