Home ठळक बातम्या सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकणारे तुम्हीच खरे गद्दार – खा. डॉ. श्रीकांत शिंदेंचा...

सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार विकणारे तुम्हीच खरे गद्दार – खा. डॉ. श्रीकांत शिंदेंचा घणाघात

कल्याणात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नाव न घेता विरोधकांवर चौफेर टीका

कल्याण दि.१७ जून :
हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackeray) यांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केले त्यांच्यासोबत आम्ही युती केली आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मात्र बाळासाहेबांचे विचार विकणारे तुम्ही, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे तुम्ही अशा शब्दांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Mp Dr. Shrikant Eknath Shinde) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. त्यांच्यासोबतच आदित्य ठाकरे (aditya Thackeray), खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांचाही नामोल्लेख टाळून खासदार शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला.

आत्मपरीक्षण करणार की नाही?…
बाळासाहेबांनी घडवलेली एवढी सगळी लोकं आपल्याला सोडून का गेली ? एवढे आमदार – खासदार का सोडून गेले? आजही अनेक लोकं येत आहेत आणि अनेक लोकांना आमच्याकडे यायचे आहे. एवढी वाताहत कशामुळे झाली याचे आपण थोडे तरी आत्मपरीक्षण करणार की नाही? असे परखड सवाल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले.

म्हणून भाजपसोबत जाण्याचा निर्णय…
एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावून तो निर्णय घेतला. त्यावेळी अस्तित्वात असलेले सरकार पडून ते मंत्री होणार याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. कारण ही युती एका विचाराने झालेली आहे. कोण मंत्री होईल.? कोण खासदार होईल यासारखी पदं ही दुय्यम आहेत. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी केल्यानेच आज त्यांच्यासोबत आपण युती केल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

न भेटण्यावरूनच घडल्या या सर्व गोष्टी…
आपल्याला छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या (CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ) ३५० व्या राज्याभिषेक दिनासाठी वेळ नाहीये. ज्यांच्या नावावर मते मागितली, त्यांच्या राज्याभिषेक दिनासाठीही आपल्याकडे वेळ नाही. तर सामान्यांना कसा काय वेळ देणार..? कार्यकर्त्यांना भेटायचे नाही की पदाधिकाऱ्यांना भेटायचे नाही. पक्ष चाललाय ना, एकनाथ शिंदेंसारखे लोकं आहेत ना. लोकांना न भेटण्यावरूनच तर या सर्व गोष्टी झाल्या असूनही लोकांना गृहीत धरण्याचे अद्याप त्यांनी सोडले नसल्याची बोचरी टीकाही खासदार डॉ. शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तर सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मात्र वर्षा बंगल्याची कवाडे सामान्यांसाठी २४ तास उघडी ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही लोकांमध्ये राहून काम करतो…
एकनाथ शिंदे साहेब (CM EKNATH SHINDE) यांचे काम बघून आज संपूर्ण महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून हजारो – लाखो लोकं आमच्यामध्ये सहभागी होत आहेत. त्यांना आम्ही काय दिलेय? कोणीही आमच्याकडे आले की तो गद्दार ? शिंदे साहेब ज्या पद्धतीने वागत आहेत ते लोकांना आवडत आहेत. अनेक लोकं येत आहेत आणि अनेक लोकांना आमच्याकडे यायचे आहे. आम्ही लोकांमध्ये राहून काम करत असल्यानेच लोकांचा आमच्यावर विश्वास असल्याचा टोमणाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी मारला.

आगामी सर्व निवडणुका युतीमध्ये लढल्या जाणार
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही राज्यात ताकदीने काम करत आहेत. महाराष्ट्राचे हित डोळ्यासमोर ठेवून ते काम करत आहेत. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका आपण भाजप शिवसेना (BJP AND SHIVSENA ALLIANCE) युतीमध्ये लढणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी या मेळाव्यात केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM DEVENDRA FADANVIS) हे देखील तितक्याच ताकदीने काम करत आहेत. अगोदरच्या सरकारने तोंडाला पाने पुसायचे काम केले. महाराष्ट्रात समृद्धी महामार्गासारखे अनेक मोठमोठे पायाभूत प्रकल्प सुरू आहेत. देशाला आणि महाराष्ट्राला जे करण्याची आवश्यकता आहे ते या युतीच्या माध्यमातून होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कल्याण डोंबिवलीतील कार्यकर्त्यांनी युती धर्माचे पालन करावे…
कोणत्याही विषयावर कार्यकर्त्यांनी संयम पाळला पाहिजे आणि युतीचा धर्म पाळला पाहिजे. ही युती कोणत्याही पदासाठी झालेली नाही. महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याच्या विचाराने झालीय. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आवरून एकत्रितरित्या काम करण्याचे आवाहनही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा