Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेतील लोकग्राम पुलाचे भूमीपूजन; मार्च २०२४ पर्यंत होणार काम पूर्ण

कल्याण पूर्वेतील लोकग्राम पुलाचे भूमीपूजन; मार्च २०२४ पर्यंत होणार काम पूर्ण

कल्याण दि.१८ जून :

कल्याण शहराच्या पूर्व भागातील आणि कल्याण रेल्वे स्थानकातून नियमितरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या लोकग्राम पुलाचे शनिवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आणि आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले. या पुलाच्या उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राज्य तसेच केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला जात होता.

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने या पुलाच्या संपूर्ण उभारणीसाठी एकूण ७८.५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यापैकी  ४२.५० कोटी रुपयांच्या निधीतून या पुलाच्या स्थापत्य कामाला सुरुवात करण्यात आली आहे. येत्या मार्च २०२४ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

कल्याण रेल्वे स्थानकावरील भार वाढतोय…
मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण हे अत्यंत महत्वाचे आणि अधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. कल्याण रेल्वे स्थानकातून दररोज शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्या जातात. तसेच या स्थानकातून कर्जत, कसारा आणि मुंबईच्या दिशेने लोकल गाड्यांची नियमित स्वरूपात वाहतूक सुरु असते. यामुळे या स्थानकातून दररोज लाखो प्रवाशांची ये – जा सुरू असते. यामुळे  दिवसेंदिवस कल्याण रेल्वे स्थानकांवरील भार वाढत आहे.

यार्ड रीमॉडेलिंगअंतर्गत पूर्वेत होणार उड्डाणपूल…

याच पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानक रीमॉडेलिंग प्रकल्प राबविण्यात येत आहे. सुमारे ८०० कोटींचा खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मालवाहतूक यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाचा समावेश असून दुसऱ्या टप्प्यात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. सद्यस्थितीत कल्याण पूर्वेतील नागरिकांना  काही अंतर पायी चालत येऊन रेल्वे स्थानक गाठावे लागत आहे. मात्र या प्रकल्पादरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलांमुळे नागरिकांना थेट आपल्या वाहनांसह स्थानक परिसरात येता येणार आहे. याच बरोबर कोणत्याही लांब पल्ल्यांच्या गाड्यांमुळे लोकल गाडयांना थांबावे लागणार नाही. तसेच लोकल गाड्यांमुळे लांब पल्ल्याच्या गाडयांचाही खोळंबा होणार नाही. यामुळे  प्रवाशांच्या वेळेची  बचत होणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.

रेल्वे विकासा संदर्भातील सर्वाधिक कामे कल्याण लोकसभा मतदारसंघात…

तर लोकग्राम पुलाच्या उभारणीनंतर प्रवाशांना प्रामुख्याने शहराच्या पूर्व भागात वास्त्यव्यास असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महामुंबई क्षेत्रात रेल्वे विकासा संदर्भातील सर्वाधिक कामे कल्याण लोकसभा मतदारसंघात झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सर्व महत्वाकांक्षी प्रकल्पांबरोबरच कल्याण शहरात रस्ते काँक्रीटीकरण, डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक, आगरी कोळी वारकरी भवन यांसारखे अनेक विकास प्रकल्प मार्गी लागत असल्याची माहिती त्यांनी दिली.

याप्रसंगी आमदार गणपत गायकवाड, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना राज्य समन्व्यक, प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर विनिता राणे, अण्णा रोकडे,  दिवा शहरप्रमुख आणि ठाणे महापालिका उपमहापौर रमाकांत मढवी,  युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी, महेश गायकवाड, भाजपा जिल्हाध्यक्ष  शशिकांत जाधव, माजी नगरसेवक संजय मोरे, मनोज राय, अभिमन्यू गायकवाड यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी,  पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
राज्यात शासन आपली दारी अभियानाला मोठा प्रतिसाद…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात शासन आपली दारी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून देण्यात येत आहे. यामुळे सर्व नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा. या अभियानाची माहिती आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने पोहोचेल यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काम करायला हवे. अशा सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा