Home ठळक बातम्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील ५६ गावांसाठी ६५ कोटींच्या जलजीवन मिशनला प्रारंभ

कल्याण लोकसभा मतदारसंघातील ५६ गावांसाठी ६५ कोटींच्या जलजीवन मिशनला प्रारंभ

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे ५१ हजार कुटुंबांना मिळणार नळाद्वारे मुबलक पाणी

कल्याण दि.८ मे :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नळाद्वारे मुबलक पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत ठाणे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ५६ गावांतील पाणी योजनांचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला. त्यासोबतच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन, मैला व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अशा एकूण ६५ कोटंच्या विकासकामांनाही यावेळी सुरुवात झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने गेल्या काही महिन्यांपासून या योजनेसाठी पाठपुरावा सुरू होता.

५१ हजार कुटुंबांना नळाद्वारे मुबलक पाणी पुरवठा…
या योजनेमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील ५१ हजार कुटुंबांना नळजोडणी देण्यात येणार असून यामुळे त्यांना नियमित स्वरूपात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. याबरोबरच श्री मलंगगडाकडे जाणाऱ्या रस्त्यांचे १२ कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या काँक्रीटीकरणाच्या कमाचेही यावेळी नेवाळी नाका येथे भूमीपूजन पार पडले.

ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंचीवरील स्वतंत्र पाणीपुरवठा…
कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या शहरी भागातील पाण्याचा प्रश्न मिटल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना राबवण्यावर आपले लक्ष केंद्रित केले होते. ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी अशा योजना मंजूर करून घरोघरी पाणी देण्याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले होते. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असलेल्या मलंगगड भागात पाणी पोहोचवण्यासाठी लाखो रुपयांची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून घेतली आहे.

५६ गावात जलजीवन मिशन योजनेचा शुभारंभ…
या मोहिमेचा पुढचा भाग कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांकडे पाहिले जात होते. पाणी योजनांसाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून निधी मिळण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. याच पाठपुराव्याला यश मिळाले असून मतदार संघातील ५६ गावातील जल जीवन मिशन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ६५ कोटी रुपये निधीतून येत्या वर्षभराच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार असून कल्याण आणि अंबरनाथ या ग्रामीण भागातील नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.

प्रत्येक घराला मिळणार प्रति व्यक्ती 55 लिटर पिण्याचे पाणी…
केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाच्या घरात नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचणार आहे. यातून सुमारे 51 हजार कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत प्रत्येक घराला 55 लिटर प्रति माणसी नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळणार आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी 726.13 कोटी रुपयांचा आरखडा तयार करण्यात आला आहे.

मतदारसंघासाठी हा सुवर्णक्षण असल्याची भावना व्यक्त…
या शुभारंभ सोहळ्यात ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांना थेट कामाचे कार्यादेश देण्यात आले. तर राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. आपल्या मतदारसंघासाठी हा सुवर्णक्षण असल्याची भावना यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार गणपत गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेनेचे महेश पाटील, राजेश मोरे, राजेंद्र चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पाणीपुरवठा विभागाचे विविध अधिकारी समवेत ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा